नवी दिल्ली: १९८४ साली देशात मोठ्या प्रमाणात शीख दंगली घडल्या होत्या. या दंगलीत मोठ्या प्रमाणत सिख समुदायाचा नरसंहार झाला होता. या दंगलीबाबत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्या वेळी गृहमंत्री नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता, तर शीख दंगल घडलीच नसती, असं सिंग म्हणाले. माजी पंतप्रधान गुजराल यांच्या १००व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
इंद्रकुमार गुजराल यांनी १९८४मधील शीख दंगली रोखण्यासाठी लष्कराचे जवान तैनात करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. गुजराल यांनी शीख दंगल उसळली, त्या रात्री नरसिंह राव यांची भेटही घेतली होती, असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं. गुजराल हे शीख दंगल उसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या तणावामुळं खूपच चिंतेत होते. त्यांनी नरसिंह राव यांची भेटही घेतली होती. ‘परिस्थिती खूपच गंभीर आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून सरकारनं लष्कराला पाचारण करायला हवं आणि जवान तैनात करायला हवेत, असं त्यांनी सांगितलं होतं.
१९८४मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या. त्यात जवळपास तीन हजार शीखांची हत्या झाली होती. दिल्लीत दंगलीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. तीन हजारांपैकी २७०० शीखांची हत्या ही दिल्लीत झाली होती.