नराधमांची दया याचिका फेटाळली

0

नवी दिल्ली । राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी माफीच्या दोन याचिका फेटाळून लावल्या आहेत. यातील एक याचिका पुण्यात ज्योतीकुमारी बलात्कार आणि खूनप्रकरणातील आरोपींची आहे. कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम दशरथ बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप यशवंत कोकडे यांनी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. त्यांचा कार्यकाळ संपत असताना त्यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

दोन याचिका फेटाळल्या
दोन याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्या आहेत. त्या दोन्ही याचिका बलात्कार आणि खून प्रकरणाच्या आहेत. पुण्यातील ज्योतीकुमारी बलात्कार आणि खून प्रकरण आणि इंदूर येथील एका 4 वर्षाच्या मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातील हे आरोपी आहेत. आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ते याविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यांची ही शिक्षा तिथेही कायम ठेवण्यात आली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती.

कॅबमध्ये बलात्कार करून केला होता खून
ज्योतीकुमारी ही बीपीओ कर्मचारी युवती होती. ती हिंजवडी-वाकड परिसरात कामाला होती. तिच्यावर कॅबमध्ये बलात्कार करुन तिचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह देहुरोड-गंहुजे परिसरात फेकून देण्यात आला होता. तिच्या नातलगांनी ती हरवल्याची फिर्याद दिल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. इंदूर येथे जितेंद्र उर्फ जीतू, बबलू उर्फ केतन आणि सन्नी उर्फ देवेंद्र यांनी एका चार वर्षाच्या चिमुकलीचे नेहरू नगर या भागातुन अपहरण केले होते. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करुन तिचा मृतदेह नाल्यात फेकुन दिला होता.

आतापर्यंत 30 याचिका फेटाळल्या
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आतापर्यंत 30 दया याचिका फेटाळून लावल्या आहेत. नियमानुसार राष्ट्रपती कोणत्याही दया याचिकेवर कधीही निर्णय घेऊ शकतात.