नराधम शिक्षक निलंबित; पोलिसांना शरण

0

अमळनेर :- कळमसरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तेरा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधम जगदीश भास्कर पाटील या शिक्षकावर बाल लैंगिक अधिनियम सन 2012 चे कलम 4,8,10,12,ऍट्रॉसिटी ऍक्ट. 3,1,11, भा.द.वी.कलम 509,354,(ळ) 376 असे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दुसर्‍या दिवशीही या घटनेचे पडसाद उमटून कळमसरे गावातील संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. मुलींच्या शाळेत महिलाच शिक्षिका नेमाव्यात ही भूमिका घेऊन जगदीश पाटील यास तत्काळ बडतर्फची मागणी केली. दरम्यान, प्रभारी गटविकास अधिकारी वायाळ यांनी संबंधित शिक्षकास निलंबित करण्याचे आदेश देऊन सोमवारी बडतर्फीचा प्रस्ताव पाठवा, अशा सूचना त्यांनी शिक्षण विभागास दिले. दरम्यान, जगदीश पाटील पोलिसांना शरण आला आहे.

गटशिक्षणाधिकारी अशोक बिर्‍हाडे, केंद्रप्रमुख अशोक सोनवणे, स.पो.नि. अवतारसिंग चव्हाण यांनी शाळेत भेट दिली. शिक्षणाधिकार्‍यांना ही घटना समजल्यावर त्यांनी उपजिल्हाशिक्षणाधिकारी गायकवाड यांना शाळेत चौकशीसाठी पाठवले तर बिर्‍हाडे यांनी मुली व पालकांचे जबाब घेतले. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही भ्रमणध्वनीवरून उपसरपंच मुरलीधर महाजन यांना पालकांच्या सोबत असल्याचे सांगितले. मधुकर माली, मनोज चौधरी, अशोक बाविस्कर, शेतकी संघ संचालक पिंटू राजपूत, अतुल नेमाडे यांच्यासह अनेक पालक हजर होते.घटना गंभीर असून शिक्षकाला तात्काळ निलंबित करून त्याचा बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव पाठवावा. कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाउपशिक्षणाधिकारी यांनी भेटी प्रसंगी सांगितले.