नरेंद्र मोदींचे नेतृत्त्व जबरदस्त, अमेरिका तुमचे उपकार विसरणार नाही – ट्रम्प

0

वॉशिंग्टन : अमेरिकेला हायड्रोक्झीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. आम्ही हे कधीच विसरणार नाही. पंतप्रधान मोदींच्या कणखर नेतृत्त्वामुळे करोनाविरुद्धच्या लढ्यात फक्त भारताचीच नाही, तर जगाची आणि मानवतेचीही मदत होत आहे, ट्रम्प यांनी म्हटले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी नरेंद्र मोदींना फोन करुन करोनाविरोधातील लढाईत मदत मागितली होती. सोबतच भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा केला नाही तर प्रत्युत्तर दिले जाईल असा धमकीवजा इशाराही दिला होता. पण भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी महान नेता असल्याचे सांगितले. बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचे कौतुक करणार त्यांचे आभार मानले. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटले आहे की, कठीण काळात मित्रांकडून जास्तीत मदतीची गरज असते. हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन संबंधी घेतलेल्या निर्णयाबद्दल भारत आणि भारतीय लोकांचे आभार. हे विसरु शकत नाही. या लढाईत आपल्या मजबूत नेतृत्त्वाने फक्त भारतीय नाही तर माणुसकीची मदत करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ब्राझिललाही मिळणार मलेरियाचे औषध

ब्राझिलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांनी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलल्यामुळे आपल्याला एचसीक्यूची निर्मिती तयार करण्यासाठी आवश्यक असलेले रॉ मटेरियल मिळणार आहे. यामुळे एचसीक्यूची मोठ्या प्रमाणात निर्मिती करुन करोनाविरुद्धच्या लढ्याला आणखी बळ येईल, असे ते म्हणाले.

स्पेनलाही देणार एचसीक्यू

करोनाचा सर्वात जास्त कहर असलेल्या देशांमध्ये स्पेनचाही समावेश आहे. भारत आता स्पेनच्या मदतीला धावणार आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची आणि स्पेनच्या परराष्ट्र मंत्री अरंचा गोंझालेझ यांच्यात बातचीत झाली. स्पेनच्या वैद्यकीय गरजा तातडीने पूर्ण करण्याबाबत आपण तयार असल्याची माहिती जयशंकर यांनी दिली.