मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून माहिती जाहीर
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तेव्हा आचारसंहिता लागू होण्याआधीच मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा बार उडवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार शनिवारी, 7 सप्टेंबरला मेट्रो 10, मेट्रो 11 आणि मेट्रो 12 या तीन नव्या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीकेसीमध्ये एका भव्य कार्यक्रमात मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) जाहीर करण्यात आले आहे.
मेट्रो 1 सेवेत दाखल…
एमएमआरडीएने मुंबईतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात विकसित करण्याचा निर्णय घेत मेट्रोचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मेट्रो 1 सेवेत दाखल झाली असून मेट्रो 2, मेट्रो 3 आणि मेट्रो 7 चे काम वेगात सुरू आहे. तर मेट्रो 4, मेट्रो 5, मेट्रो 6 च्या कामालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. आता त्यापुढे जात एमएमआरडीएने उर्वरित प्रकल्पही मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो 10, मेट्रो 11 आणि मेट्रो 12 चे भूमिपूजन करत हे प्रकल्पही मार्गी लावले जाणार आहेत.
कोट्यावधींचा खर्च अपेक्षित…
गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) असा अंदाजे 9 किमीचा मेट्रो 10 मार्ग असणार आहे. तर या मार्गासाठी अंदाजे 3600 कोटी खर्च अपेक्षित आहे. वडाळा ते सीएमएसएमटी असा 14 किमीचा मेट्रो 11 मार्ग असून यासाठी 8739 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. तर मेट्रो 12 मार्ग कल्याण ते तळोजा असा असून हा मार्ग 20.75 किमी आहे. यासाठी 4132 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अशा या तीन मेट्रो मार्गाचे भूमिपूजन बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर सकाळी 11 वाजता होणार आहे.