नरेंद्र मोदीजी, गांधींच्या वाटेला जाऊ नका!

0

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या डायरी अन् कॅलेंडरवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हटवून त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्याबद्दल देशभर मोदी यांची निंदा सुरुच आहे. मोदी हे रा. स्व. संघाचे प्रॉडक्ट आहे, अन् गांधींना संपविण्यासाठी संघाने काय प्रयत्न केलेत ते जगजाहीर आहे. इतक्या वर्षांत गांधींना संपविण्यास त्यांना अजिबात यश आले नाही. उलटपक्षी गांधी प्रत्येकाच्या हृदयात आढळस्थान प्राप्त करून बसले. गांधी नि:शस्त्र आहेत, अहिंसक आहेत, परंतु त्यांनी बलाढ्य अशी इंग्रजी सत्ता हाती शस्त्रही न घेता उलथावून टाकली होती. हे नरेंद्र मोदी यांनी लक्षात ठेवावे. गांधींच्या वाट्याला जाऊ नका, ते तुम्हाला परवडणारे नाही, हेच या निमित्ताने मोदी यांना सूचवावेसे वाटते!

माणूस स्वतःच्याच प्रेमात किती वेडं होऊ शकतो, याचे जीवंत उदाहरण पहायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पहा! या माणसाने चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हटवून त्यांच्या जागी स्वतःची वर्णी लावून घेतली. हाती सत्ता असेल अन् समोर स्तुतिपाठकांचा गोतावळा असेल तर काय काय करता येऊ शकते, ते सर्वकाही आता नरेंद्र मोदी करत सुटले आहेत. एखाद्या कॅलेंडरवरून गांधी हटवून तेथे स्वतःचे छायाचित्र चिपकवले म्हणजे कुणाला गांधी होता येत नाही, हे सत्ताधीश असलेल्या या माणसाला कोण समजविणार? अन् ते तुमचे ऐकतील असेही नाही! ज्या रा. स्व. संघाच्या विचारधारेने गांधींची हत्या केली, त्याच विचारधारेतून मोदीही आले आहेत, गांधींना मारून इतके वर्षे झालीत, तरी गांधी काही मरत नाहीत. उलट नि:शस्त्र, अहिंसक आणि अजिबात उपद्रव्यमूल्य नसलेला हा महात्मा आजही क्षणार्धात अब्जावधी प्रतिगांधी तयार करतो, इतकी ताकद या व्यक्तीच्या विचारांत आहे, ते विचार काही संघाला मारता आले नाहीत. विचार संपविता येत नाही म्हणून जेथे गांधी असतील तेथे मोदी चिपकविण्याचा प्रकार आता ही मंडळी करत आहेत, आज खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कॅलेंडर अन् डायरीवरून गांधी हटवले, उद्या अर्थव्यवस्थेतील चलनात असलेल्या नोटांवरूनही ते गांधी हटवतील. सत्ता आहे म्हणजे तसे करता येणे त्यांना अशक्य नाही. नोटांवर उद्या गांधीऐवजी मोदी आले तर कुणाला आश्‍चर्यही वाटणार नाही.

परंतु, या देशातील प्रत्येकाच्या नसानसांत भिनलेले, प्रत्येकाच्या मन-मेंदू आणि हृदयात कायमचे कोरले गेलेले गांधी ही मंडळी कशी हटवतील? गांधी हे काही नुसते शरीर नव्हते, त्यांना गोळ्या घालून ठार मारले म्हणजे ते संपले! गांधी हे या देशाचा पंचप्राण आहेत, या देशाचा आत्मा आहेत, आणि आज जी काही या देशाची ओळख आहे तीदेखील गांधीच आहेत. मोदींना या जगात कोण ओळखते? गांधींच्या देशाचा पंतप्रधान हीच मोदींची जागतिक पटलावरील खरी खुरी ओळख! गांधींना हटवण्याचे पाप करत असाल तर तुम्ही गांधी नाही, स्वतःची, या देशाची ओळख पुसण्याचे पाप करत आहात! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातृसंस्थेला एकच सांगावेसे वाटते, बाबा हो! इतके वर्षे तुम्ही गांधी संपविण्यासाठी जीवाचा आटापिटा केला, तरी तुम्ही या महात्म्याचे काहीही बिघडवू शकले नाहीत. तुमच्या बंदुकीतील गोळ्यांनी ते मेले नाहीत, तुम्ही त्यांची छायाचित्रे हटविली तरी ते संपणारे नाहीत, आ-चंद्र सूर्य ते या देशाच्या मातीत जीवंत राहतील. बुद्ध, महावीर, नानक अन् विवेकानंद जशी या मातीची गरज आहे, तशीच गांधीदेखील या मातीची नितांत गरज आहे. या मातीपासून तुम्ही कदापिही गांधींना दूर करू शकणार नाहीत, तुमच्या पुढील असंख्य पिढ्यांकडूनही ते काम होणारे नाही! ज्या खादी ग्रामोद्योग मंडळाच्या डायरीवरून आणि त्यावरील छायाचित्रावरून मोदींच्या वैचारिक कोतेपणाचा बुरखा फाटला, त्या खादीचा विचार, प्रचार आणि चरख्याचा महात्मा गांधी यांच्या आत्म्याशी थेट संबंध आहे. यापूर्वी सहावेळा या कॅलेंडर अन् डायर्‍यांवर गांधीजींचे छायाचित्र छापले गेले नाही. म्हणून, त्यांच्या जागी कधीही राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांचे छायाचित्रही छापले गेले नाही. आजवर जे कधीच घडले नाही ते आक्रित यंदा पहिल्यांदाच घडले आहे. स्वतःच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या आणि इतरांनाही बुडावयास निघालेल्या आसक्तीसक्त पंतप्रधानाने कॅलेंडर अन् डायर्‍यांवरील गांधींची जागा घेतली. परंतु, असे करताना हे पंतप्रधान महोदय विसरलेत की गांधी होणे हा काही तोंडाचा खेळ नाही! गांधी होण्यासाठी अनेक वर्षांची तपश्‍चर्या लागते, केवळ चरख्यावर सुत कातण्याचा अभिनय केल्याने कुणाला गांधी होता येत नाही. कारण, गांधी हा माणूस नाही तो विचार आहे, आणि या विचाराच्या आसपासही फिरकण्याची मोदी यांची पात्रता नाही.

गांधी म्हणजे, समान न्याय, समता आणि धर्मनिरपेक्षता! या मूल्यांचा आणि मोदींचा दूरदूर तरी काही संबंध आहे का? स्वतःची प्रतिमा उंचविण्यासाठी निव्वळ जाहिरातबाजी करणे सोपे आहे, त्यासाठी एखाद्या प्रतिकावरून गांधींना बाजूला करणेही सोपे आहे, सत्ता असली की असे करता येते. परंतु, डोक्यात जो नथुराम भरलेला आहे तो बाजूला करून तेथे गांधींच्या विचाराचा प्रकाश पाडून घेणे किती कठीण असते ते मोदींना कळणारे नाही. ते कळण्यासाठीही पात्रता लागते, मुळात ती पात्रताच मोदींकडे नाही. आजकाल या देशात कुठेही पाहिले की मोदीच मोदी दिसतात. पेट्रोलपंपावर, रेल्वे स्थानकावर जेथे सरकारी आणि शासकीय जागा दिसेल तेथे मोदीच दिसत आहेत. अब्जावधी रुपये खर्च करून प्रसिद्धीची ही हौस भागवली जात आहे. हा पैसा लोकांचा आहे. इतका प्रसिद्धीपिसाटपणा चांगला नाही. लोकांना उबग आली असून, किळसवाणे वाटू लागले आहे. गुजरात दंगलीत तुम्ही काय केले, अन् देशातील एक मोठा समाज कसा तुम्हाला भीत भीत जीवन जगत आहे, हे विसरता येणारे नाही. मुळात तुमच्यात आणि गांधीत येथेच फरक आहे. गांधींची कुणाला कधीच भीती वाटली नाही, कारण ते खर्‍याअर्थाने निर्भय होते. तुमची लोकांना भीती वाटत असेल तर तुम्ही गांधी होऊ शकत नाही. पहिल्यांदा तुम्ही गांधी समजून घ्या, नंतर गांधी व्हा! अन् मग् खुशाल गांधींची जागा घेण्याचा प्रयत्न करा! जेव्हा तुम्ही गांधी समजून घ्याल तेव्हाच तुमच्या हे लक्षात आले असेल की आपण गांधींच्या जागेवर कधीही बसू शकत नाही. इतकी उंची आपल्याला लाभलेली नाही. तेव्हा गांधींऐवजी स्वतःचे छायाचित्र एखाद्या कॅलेंडर किंवा डायरीवर छापण्याची मानसिकताही तुमची बदललेली असेल.

मुळात या देशाला अत्यंत खुजे असे नेतृत्व लाभले आहे, नोटाबंदीच्या रांगेत सर्वसामान्यांचे बळी घेणारे अन् दंगलीत रक्तपात घडविणारे हे नेतृत्व त्यांची फारशी उंची वाढविण्याच्या भानगडीत कधी पडणार नाही. उलटपक्षी आपल्यापेक्षा अधिक उंचीच्या लोकांना छाटण्याचा खटाटोप ते करत बसेल. काल त्यांना आंबेडकर चालत नव्हते, आज ते आंबेडकरांचा उदोउदो करत आहेत. काल त्यांना विवेकानंदही जवळचे वाटत नव्हते आज ते विवेकानंदांचाही उदोउदो करत आहेत. गांधींचे शरीर संपविण्याचे पातक तर याच मंडळींचे आज ते गांधींच्या जागेवर बसण्याचा खटाटोप करत आहेत. या देशातील लोकांनी मोदी यांच्याकडे पाहून त्यांना बहुमताने सत्ता देऊन चूकच केली. कारण, ते देशाचा इतिहासच पुसण्याचे पाप करत आहेत. परंतु, बेंडूक कितीही फुगला तरी तो बैल होऊ शकत नाही, अशी एक ग्रामीण म्हण आहे. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अत्यंत चपखल बसते. मोदींनी कितीही गांधी होण्याचे नाटक केले तरी ते गांधी होऊ शकत नाही. त्यांनी गांधी होण्याचा निश्‍चित प्रयत्न करावा ते त्यांच्यासाठी भल्याचे राहील. परंतु, गांधींना हटविण्याचा प्रयत्न ते जर वारंवार करत राहतील तर भारतीय जनता ते कदापिही सहन करू शकणार नाही. प्रत्येकाच्या मनपटलावर गांधी कायमचे कोरले गेले आहेत, प्रत्येकाच्या हृदयात ते विराजमान झालेले आहेत. भारताची ओळखच गांधींचे राष्ट्र अशी आहे, भारत हा मोदींचे राष्ट्र असे कधीही कुणी म्हणणार नाही! म्हणून मोदींनी वेळीच भानावर यावे, नाही तर ही भारतीय जनता तुम्हाला खड्यासारखी बाजूला सारेल, हे लक्षात घ्यावे. तुम्ही प्रत्येकाशी खेळू शकता, गांधींशी नाही. कारण, गांधी ही खेळण्याची विषयवस्तू नाही! गांधी ही अशी ताकद आहे, त्याचा प्रत्यय पाशवीशक्ती आणि सत्ता असलेल्या इंग्रजांना आलेला आहे. हातात शस्त्रही न घेता जो महात्मा बलाढ्य इंग्रजी राजवटीला उलथावून लावू शकतो, त्यांना या देशातून पळवून लावतो. त्याला तुमची बहुमताची स्वदेशी सत्ता उलथवून लावण्यासाठी किती वेळ लागेल?

– पुरुषोत्तम सांगळे
निवासी संपादक,
‘जनशक्ति’, पिंपरी-चिंचवड