नरेंद्र मोदी केविलवाणे!

0

वाक्चातुर्याने सार्‍या देशावर गारूड घालणारा, मसिहा अवतरल्याची लोकांना खात्री वाटणारा, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा अशी स्वप्ने वाटणारा वज्रधारी नेता निवडणुकीच्या पूर्वसंध्येला घायाळ झाला आहे. 2025ची वाट बघा असे हिणवणार्‍या या नेत्याचे विमान स्वपक्षीयांनीच जमिनीवर उतरवले आहे. साहजिकच कालपरवापर्यंत आवेषात आणि दपोक्तीयुक्त भाषणे ठोकणार्‍या आणि स्वत:च्या ताकदीवर भाजपला देशाची सत्ता मिळवून देणार्‍या नेत्याची अवस्था केविलवाणी झाली आहे. किती हा सासूरवास!

2014ची लोकसभा निवडणूक. पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले. त्यादिवसापासून मोदींनी आपल्या वाक्चातुर्याने सार्‍या देशावर गारूड घातले. जनतेने भरभरून त्यांच्या झोळीत मतांचे दान देवून सत्तेवर बसविले. यानंतर पहिल्यादिवशी संसदेच्या पायरीवर माथा टेकविल्यावर तर या देशात मसिहा अवतरल्याची लोकांना खात्रीच पटली. 8 नोव्हेंबर 2016च्या रात्री नोटाबंदी जाहीर केल्यावर तर आपल्या खात्यात 15 लाख जमा झाल्याचे, अच्छे दिन आल्याची स्वप्ने लोकांना पडू लागली. नमो बाधा झालेल्या भक्तांनी केवळ पुतळेच उभारायचे बाकी ठेवले.

विरोधकांनो, 2025च्या निवडणुकीची तयारी करा अशीही खिल्ली उडवायाला सुरूवात झाली. त्याला कारणेही होतीच तशी. केवळ प्रचंड नव्हते तर महाप्रचंड बहुतमत मिळाले होते. मोदी जातील तिथे उदो उदोचा नारा होता. खेडेगावच नव्हे जगभरातील यच्चयावत देशसुद्धा वेडावले होते. तिकडील भारतीय तर छाती फुगवून चालत होते. मोदींचा प्रभाव इतका होता की, विरोधकसुद्धा चिडीचुप झाले. सगळ्या बाबतीत मोदी आणि काँगे्रसची, त्यांच्या नेत्यांची तुलना होवू लागली. मात्र, अंधत्व आलेल्या लोकांनीही कोणताही सारासारा विचार न करता सोशल मिडियावर आली चांगली की प्रतिक्रिया ढकल पुढे आणि वाईट असली की चढव हल्ला असे सुत्र बाळगले. त्यामुळे ज्यांनी आजवर धर्मनिरपेक्षतता बाळगणार्‍या, समाजजागृतीचे काम करणार्‍या, देशउभारणीत अख्खे आयुष्य खर्ची घालणार्‍या असंख्य माणसांना आणि वेगवेगळ्या संस्थांनाही गेल्या 70 वर्षात आपणच चुकीच्या मार्गाने चालत होतो असे वाटू लागले. मोदींकडून आश्‍वासनांचा पाऊस पडू लागला आणि त्याखाली जनता चिंब भिजू लागली. पण पाऊस पडायचा थांबेना. शरीर गारठून मरायची वेळ आली. तेव्हा पाऊस पडल्याचा केवळ आपल्याला भास होत असून आपण संमोहित झालो होतो याची जाणीव झाली. एखादी परी आपल्या कानाशी काहीतरी खुसपुसू बोलत असतानाच जाळ निघावा अशी कानफटात बसल्यावर जाग यावी आणि ती परी वगैरे स्वप्न होते हे समजावे तसे लोकांचे झाले. मात्र, जनता आपल्या अधीन झाली आहे अशा भ्रमात असलेल्या मोदींच्या बोलण्यात, वागण्यात उद्दामपणा होताच. आधी मी, नंतर भाजप असे झाले.

अच्छे दिनची वाट बघण्यात स्वत:चीच वाट लागल्याचे लक्षात आल्यावर लोकांमधून कुजबुज सुरू झाली. याचाच नंतर आवाज बनला. इतर मंत्री आणि संघ परिवारही बोलू लागला. मोदींनी दिलेल्या आश्‍वासनांच्या व्हिडिओ, ऑडिओ क्लिपस् बाहेर येवू लागल्या. खिल्ली उडवायला सुरूवात झाली. निवडणूक काळात मिळालेल्या जाहिरातींना मिंधा झालेल्या मिडियानेही तोंड उघडले. 15 लाखांचे काय झाले असे सामान्य माणूस विचारू लागला. त्यातच डिसेंबरमध्ये झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत पानीपत झाल्यावर तर संघ परिवाराने राम मंदिर विषय काढून त्यांचा चक्रव्यूहच रचला. त्यात पुन्हा विजयाबरोबरच पराभवाचीही जबाबदारी नेतृत्वाने घ्यायला पाहिजे असा जी जी रं जी जी असा सूर लावला. ’पुढचा पंतप्रधान कोण, हे सांगणं अवघड आहे,’ असं एका योगगुरूने म्हणत मोदींची सद्दी संपत चालली आहे, अशी जणू भविष्यवाणीच केली. एकूणच हा तोंड दाबून बुक्क्यांचा मारच होता. मग मात्र, इतकी वर्षे हवेत उडणारे मोदींचे विमान झपकन जमिनीवर उतरले. शेतकरी, उद्योजक, बेरोजगार तरूण…समाजातील प्रत्येक घटकाने घेरले. हा चक्रव्यूह भेदण्यासाठी काँग्रेस आणि नेहरू-गांधींच्या पिढ्यांचा उद्धार सुरू केला. परंतू, हे मुद्दे काही लोकांच्या पचनी पडेना झाले. काँग्रेसने विशेषत: राहुल गांधी यांनी सोडलेल्या राफेल अस्त्रात मोदींना भूमीगत होण्याची वेळ आली आहे. वेळ कशी असते पहा, पात्रता नसतानाही मोदी लाटेत निवडून आलेला किंवा मंत्रीपद मिळालेला एकही जण संसदेत पाठराखण करायला कोणीही उठला नाही. त्यामुळे अशा या विपरित स्थितीत कोण कोणाचे नसे या संतवचनाची आठवण झाल्याने त्यांनी भाषणातून एकदम केविलवाणा सूर लावायला सुरूवात केली आहे.

पावणेपाच वर्षे जनतेच्या एकाही प्रश्‍नाला सामोरे न जाणार्‍या मोदींनी एक जानेवारीला एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांची देहबोली, त्यांची भाषा बदललेली दिसली. एरवी भाषण करताना किंवा संभाषणादरम्यानही ते जी आक्रमकता दाखवतात, ती या मुलाखतीमध्ये दिसली नाही. त्यांची भाषा विनम्रतेची होती. “आपण जे चार वर्षांत केले ते गेल्या 100 वर्षांतही होऊ शकले नाही,’’ अशी दर्पोक्ती लाल किल्ल्यावरून करणारी हीच का ती व्यक्ती असे वाटण्याजोगी स्थिती होती. सभांमध्ये मोदी आवेशानं बोलतात. 56 इंची छातीचा उल्लेख ते करतात. अतिशय कठोर, जहरी टीका विरोधकांवर करतात. मुलाखतीमध्ये मात्र ते मृदू भाषिक वाटत होते. तरीही ते ट्रोलपासून वाचले नाहीत. ही मुलाखतच कशी फिक्स होती, त्यांनी कोणतेकोणते विषय टाळले यावर चर्चा सुरू झाली. यानंतर वाचण्यासाठी मोदींनी पुढचे पाऊल नवी दिल्ली येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत टाकले. पाच वर्षापूर्वी अशा बैठकांपूर्वी कौन आया? शेर आया अशा आरोळ्यांमध्ये मोदींची नाट्यमय एन्ट्री कार्यकारिणीच्या मंचावर व्हायची.

पूर्वीच्या त्या उत्साहाची जागा आता चिंतेने घेतली आहे. संमलनात मोदी म्हणाले, काँग्रेस व त्यांच्या सहकार्‍यांच्या इशार्‍यावर चालणारी व्यवस्था, तसेच त्यांच्या रिमोटवर चालणारे नेते आणि अधिकार्‍यांनी मला हरतर्‍हेने त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांनी मला छळण्याची एकही संधी सोडली नाही. गुजरातमध्ये प्रचार सभेला संबोधित करताना काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने 2007 साली म्हटले होते कि, मोदी काही महिन्यांत तुरुंगात जाईल. तर विधानसभेमध्ये काँग्रेसचे नेते भाषण द्यायचे की, मोदींनी तुरुंगात जायची तयारी करावी. आता मुख्यमंत्री आहात तर तुरुंगांची साफसफाई व्यवस्थित ठेवा, कारण तुम्हाला पुढचे जीवन तुरुंगातच काढायचे आहे. या भाषणात सासुरवासाची कथा सांगत मोदी रडायचे तेवढे बाकी राहिले. जीएसटीमध्ये कपातीची नामुष्की, आर्थिक निकषावर 10 टक्के आरक्षणाचा निर्णय घेवून सवर्णांना खुश करण्याचा प्रयत्न, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सोनिया गांधी यांना चहापानाचे निमंत्रण देणे यावरून मोदी नरमल्याचे दिसले. मात्र, त्यावरून भयंकर म्हणजे त्यांचे केविलवाणे होणे. सगळेच विचित्र! कदााचित त्यांच्या मनी असावे सत्ता मिळो अथवा न मिळो; पण निवडणूक आपल्याच नेतृत्वाखाली लढली जावी.