नरेंद्र मोदी ट्विट फोटो आणि तन्मय भट्ट

0

नवी दिल्ली – कॉमेडी ग्रुप एआयबी पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे. एआयबीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या हुबेहूब दिसणार्‍या व्यक्तीचा फोटो ट्विट करून त्यांची खिल्ली उडवली. ट्विटरकरांनी जेव्हा ट्विट करून एआयबीवर टीका करण्यास सुरूवात केल्यावर तत्काळ त्यांनी पोस्ट डिलीट केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागाने एआयबी कॉमेडी ग्रुपचे सदस्य असलेले कॉमेडियन तन्मय भट्ट विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

एआयबीने आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा दिसणारा एक व्यक्ती स्थानकावर उभा राहून मोबाईलमध्ये पाहत आहे. एआयबीने पंतप्रधान मोदींची उडवलेली ही खिल्ली जशी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नेटिझन्सनी आक्षेप घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर कॉमेडी ग्रुप एआयबीने तत्काळ ही पोस्ट डिलीट केली. परंतु, तोपर्यंत मुंबई पोलिसांच्या नजरेस हे ट्विट पडले आणि त्यांनी सायबर सेलला याबाबत माहिती दिली. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वीही एआयबी एका अश्लील विनोदाच्या कार्यक्रमामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडली होती.

फिर भी हम नहीं सुधरेंगे
एआयबीकडून टाकलेल्या पोस्टवर नेटिझन्सनी जोरदार हल्ला चढवल्यानंतर कॉमेडी ग्रुपकडून ट्विट डिलीट करण्यात आले. परंतु, नेटिझन्सच्या ट्विटचा फारसा परिणाम एआयबीवर झालेला दिसला नाही. कारण, तन्मय भट्टने ट्विट करून सांगितले की, आम्ही असे विनोद बनवत राहणार आणि गरज पडली तर त्यांना डिलीट पण करणार. आम्ही विनोद करणे बंद करणार नाही. गरज पडली तर माफीही मागू. आमच्याबद्दल कोण काय विचार करते त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही.