नरेंद्र मोदी सुध्दा रस्ता बदलतात : संजय राऊत

0
पिंपरीत खासदार श्रीरंग बारणे लिखित ‘आपला वैभवशाली मावळ लोकसभा मतदार संघ’ पुस्तकाचे प्रकाशन
दिल्लीत असेच फिरतोय फाटक्या सारखे, टरकलीच पाहिजे आम्हाला बघून 
पिंपरी चिंचवड : दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांचा दरारा आहे. आम्हाला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुध्दा रस्ता बदलतात. आम्ही फाटके लोक आहोत… आम्हाला मंत्रीबित्री पदाची काहीही गरज नाही… अनेकवर्ष दिल्लीत आम्ही असेच फिरतोय फाटक्या सारखे, फकीरा सारखे.. टरकलीच पाहिजे आम्हाला बघून, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. पिंपरीत खासदार श्रीरंग बारणे लिखित ‘आपला वैभवशाली मावळ लोकसभा मतदार संघ’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे, संपर्कप्रमुख बाळा कदम, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, मावळ जिल्हा महिला संघटिका शादान चौधरी, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शिरुरच्या संघटिका सुलभा उबाळे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, अनंत कोर्‍हाळे उपस्थित होते.
लाटेत वाहून जाणं मतदारांनी थांबवाव…
संजय राऊत म्हणाले की, जो कधी ग्रामपंचायत निवडणूकीत जिंकला नाही अशी मंडळी लाटेत खासदार झालीत. लाटेत वाहून जात मतदारांनी अनेक दुर्जनांना निवडून दिले, त्यामुळे लोकशाहीचे मंदिर आता राहिलेले नाही. सध्याच्या लाटेत वाहून जाणं आता मतदारांनी थांबवलं पाहिजे. गुन्हे दाखल असलेले लोक संसदेत आले. त्यामुळे त्या मंदिराचे पावित्र्य उरलेले नाही, असेही संजय राऊत म्हणाले. मावळ मतदार संघाची भौगोलिक, ऐतिहासिक माहिती असेलेले पुस्तक खासदार श्रीरंग बारणे यांनी लिहिले आहे. साहित्यिक मूल्य असलेले हे पुस्तक आहे. खासदार बारणे यांच्या सारखे प्रत्येक खासदार, आमदाराने मतदार संघाची माहिती असलेले पुस्तक लिहावे, असेही ते म्हणाले.
मावळ मतदार संघ समृद्ध…
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, भारतातील सर्वात मोठे मंदिर संसद भवन आहे. खासदार बारणे त्याचे नम्र उपासक आहेत. राज्यातील लोकभावना, भाषा, संस्कृती यावर बारणे वेळोवेळी संसदेत आवाज उठवितात. मावळ मतदार संघ खूप समृद्ध आहे. तुकोबांच्या अभंगवानीने महाराष्ट्र फुलला आहे. खासदार बारणे यांनी देशाच्या पंतप्रधानांना तुकोबांची अभंगवाणी भेट दिली आहे. अध्यात्मिक परंपरेचा वारसा घेऊन ते काम करत आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
पुस्तकात धार्मिक, ऐतिहासिक माहिती…
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळ मतदार संघ शहर, ग्रामीण, आदिवासी अशा भागात विभागाला गेला आहे. मतदार संघातील नागरिकांच्या बोली-भाषा वेगळ्या आहेत. कर्जत परिसरातील आदिवासी पाड्यावर आजपर्यंत वीज पोहचली नव्हती. मी ‘शिव प्रकाश’ योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागात वीज पोहचविली आहे. नागरिकांना सहज समजावा त्यासाठी पुस्तक लिहिले आहे. मतदार संघातील धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, पर्यटन स्थळे याची माहिती पुस्तकात आहे. यापूर्वी ‘शब्दवेध’,  ‘लढवय्या’  ही दोन पुस्तके प्रकाशित केली असून हे तिसरे पुस्तक आहे. आगामी काळात आणखीन एक पुस्तक लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.