भुसावळ । शहरातील नर्मदा नगर भागात मोकळ्या पटांगणात वाळलेल्या गवतास अचनाकपणे आग लागल्याची घटना रविवार 23 रोजी दुपारच्या सुमारास घडली. हवेमुळे या गवताने अधिकच पेट घेत या पटांगणावरील संपुर्ण गवत जळाल्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले होते. मात्र अग्नीशमन दलाच्या दोन बंबाद्वारे आग विझविण्यात आल्याने यात सुदैवाने मोठी हानी टळली. नागरिकांच्या सतर्कतेने आग विझविण्यात आली. मात्र यामागील नेमके कारण समजू शकले नाही.
परिसरातील नागरिकांमध्ये धावपळ
नर्मदा नगर येथे घरांना लागूनच खुले पटांगण आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत वाढले, उन्हाळ्यात येथील संपुर्ण गवत वाळले आहे. वाढत्या तापमानामुळे या गवताला आग लागली असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. दुपारी अचानकपणे गवताने पेट घेतला. मात्र काही समजायच्या आतच हवेमुळे आग आणखीच वाढली. धुराचे लोट संपुर्ण परिसरात फैलावताच नागरिकांनी याठिकाणी धाव घेतली यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून नगरसेवक अमोल इंगळे यांनी अग्नीशमन दलास पाचारण केले. आग विझविण्यासाठी दोन अग्नीशमन दलाचे दोन बंब लागले.