सासवड । शाळेत शिकवत असताना पाठीमागे बघितले म्हणून फादर टॉम या मुख्याध्यापकाने लहान मुलीच्या खांद्यावर जोरदार फटका मारल्याने तिचा खांदा दुखावला गेला आहे. याबाबत मुलीचे वडील संदीप घारमळकर यांनी सासवड पोलिस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे.
परिंचे (ता. पुरंदर) येथे गेल्या आठ वर्षांपासून सेंट मेरीज पब्लिक स्कूल ही इंग्रजी शाळा सुरू आहे. यामध्ये नर्सरीच्या वर्गात ईश्वरी संदीप घारमळकर ही शिक्षण घेत आहे. दरम्यान शाळेत फादर मुलांना शिकवीत असताना ईश्वरीने पाठीमागे बघितले. त्यामुळे चिडून फादर टॉम याने तिला मारहाण केली. त्यामुळे तिचा खांदा दुखायला लागला. तिने ही गोष्ट तिच्या पालकांना सांगितल्यानंतर घारमळकर यांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस हवालदार कैलास सकट यांनी दिली. याबाबत पुढील तपास सहायक फौजदार एस. आर. गायकवाड करत आहेत.