जळगाव : नोकरीचे आमिष दाखवत जळगाव शहरातील टागोर नगरातील तरुणीची दोन लाख 60 हजार रुपयात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला.
नोकरीच्या आमिषाने उकळली रक्कम
शहरातील टागोर नगरातील रवीना बावणे ही तरुणी वास्तव्यास आहे. 26 मे रोजी रवीना ही गुगलवर जॉब शोधण्यासाठी व्हॅकन्सी शोधत होती. यावेळी इंडिया जॉब पोर्टलवर नर्सिंग पोस्टसाठी तिला व्हॅकन्सी दिसून आली. त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तिने संपर्क साधून नोकरी बद्दल विचारपूस केली. फोनवरील महिलेने संबंधित व्हॅकन्सीची माहिती दिल्यानंतर कागदपत्रांची मागणी केली आणि नोकरीसाठी सुमारे तीन लाख रुपयांचा खर्च येईल असे देखील सांगितले. त्यानंतर महिलेने रवीना हिचे विश्वास संपादन करून तिच्याकडून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकूण 2 लाख 60 हजार रुपये उकळले.
फसवणुकीची खात्री होताच गुन्हा
तरुणीने पैसे भरल्यानंतर काही दिवसानंतर तरुणीला जॉब लेटर सुध्दा मिळाले पण नोकरी मिळाली नाही. अखेर रवीना हिने सोमवार. 13 जून रोजी संबंधित महिलेला फोन केला आणि पैसे परत करण्याची विनंती केली मात्र पैसे परत न मिळाल्यामुळे अखेर तरुणीने गुरूवारी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार हे करीत आहेत.