नर्सेस फेडरेशनतर्फे बेमुदत संपाचा इशारा

0

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने आता पुन्हा एकदा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनतर्फे येत्या 9 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोलापूर येथे 10 जूनला महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची 18 वी राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व स्तरातील रिक्त पदे ऑगस्ट महिन्यामध्ये भरली जातील, बदलीबाबत धोरण ठरविले जाईल, परिचारिकांना अतिरिक्त इतर कामे दिली जाणार नाहीत, परिचारिकांच्या भत्ते आणि 7 व्या वेतन आयोगाचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येईल यांसारख्या परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यावर सार्वजनिक राज्य आरोग्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. आणि येत्या काही दिवसांत मागण्या त्वरित निकाली काढल्या जातील, असे आश्वासन यावेळी देशमुख यांनी फेडरेशनला दिली होते. मात्र दीड महिन्यानंतरही आश्वासनाची पूर्तता न झाल्याने बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांनी दिली.