नवउद्योजकांना आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार

0
शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर ’अ‍ॅटो हब’ म्हणून ओळख  : आयुक्त 
बीएनआयच्या ‘मिलान्ज एक्स्पो’ चे उद्घाटन
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका नवउद्योजक, लघुउद्योजक, कंपन्यांना नेहमीच सहकार्य करते. महापालिकेकडून दिलेल्या पायाभूत सुविधा आणि एमआयडीसीचे भूखंड मागील कालावधीत विकसित झाल्यामुळे शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर ’अ‍ॅटो हब’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्याला आणखी चालना देण्यासाठी महापालिका अ‍ॅटो क्लस्टर तसेच आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारले आहेत. त्या माध्यमातून टोमोबॉईल, रोबोटिक्स, स्वयंचलित कार, इलेक्ट्रिक कार उद्योगात येणार्‍या नव उद्योजक, कंपन्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, अशी घोषणा पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली.
बीएनआयच्या स्मरणिकेचे प्रकाशन
बीएनआय (बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल) पिंपरीच्या वतीने अ‍ॅटो क्लस्टर येथे आयोजित केलेल्या ‘मिलान्ज एक्स्पो’ या औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (दि.1 डिसेंबर) झाले. यावेळी पालिकेचे सहशहर अभियंता प्रविण तुपे, बीएनआयच्या पिंपरी चिंचवड विभागाचे व्यवस्थापकीय संचालक देवानंद देशमुख, सदस्य स्नेहल कोठारी, मनोज अगरवाल, भारत दिघे, विनीत बियाणी आदी उपस्थित होते. यावेळी बीएनआयच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
पिंपरी चिंचवडचा चेहरामोहरा बदलला…
हर्डीकर म्हणाले की,  ’बदल’ ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून अशा बदलांमधूनच विकास साधता येतो. पिंपरी चिंचवड शहरानेही गेल्या काही वर्षात आपला चेहरामोहरा बदलला आहे. औद्योगिक प्रकल्पांमुळे शहरीकरणात वाढ होऊन शहराचा चोहोबाजूने विकास होत आहे. त्यामुळे लघुउद्योगात, छोट्या मोठ्या कंपन्यात, सुशिक्षित बेरोजगारांना व छोट्या व्यवसायिकांना रोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी, चाकण, तळेगाव या भागांमध्ये औद्योगिक कंपन्यामुळे ’इंडस्ट्रियल हब’ तर हिंजवडी, तळवडे या परिसरामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमुळे ’आयटी हब’ म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख निर्माण झाली आहे.
72 देशांमध्ये संघटनेचा विस्तार…
बीएनआय हा विविध क्षेत्रातील उत्पादक, विक्रेते, सेवा देणार्‍या आस्थापना, संस्था, टोमोबाईल, कॉम्प्युटर व आयटी क्षेत्रातील कंपन्याचा समावेश असणारा व्यवसायिक समुह आहे. डॉ. आयवन माईसनर यांनी व्यवसायवृध्दीच्या उद्देशाने 1985 मध्ये जागतिकस्तरावर बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल ही संघटना सुरू केली. आज ही संघटना 72 देशांमध्ये असून सुमारे अडीच लाख सभासद आहेत. भारतामध्ये संघटनेचे 25 हजारांहून अधिक सदस्य असून 68 शहरांमध्ये बीएनआयचा विस्तार झाला आहे. त्यांच्याव्दारे 10 हजार कोटींपेक्षा अधिक वार्षिक व्यवसाय केला जातो, असे देशमुख यांनी सांगितले.
प्रदर्शन सर्वांसाठी मोफत…
या प्रदर्शनात पर्यावरण रक्षणासाठी ई-वेस्ट संकलनही करण्यात येत आहे. सुशिक्षित बेरोजगार आणि कंपनी व्यवस्थापन यांचा थेट संपर्क व्हावा, या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये वाहन उत्पादकांपासून ते घरगुती साहित्य, उपकरणांसह विविध क्षेत्रातील सेवा आणि सल्लागार यांचे 50 स्टॉल उभारण्यात आले आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून या ठिकाणी विविध शाखेतील विद्यार्थी, गृहिणी, उद्योजक, व्यापारी व ग्राहकांनी भेट द्यावी, असे आवाहन बीएनआयच्या वतीने करण्यात आले आहे.