धुळे । महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठीची सुत्रे माझ्या हातात आली तर दुसर्या पक्षातून भाजपात बेडूक उडी मारणार्या आयारामांपैकी एकालाही नगरसेवकपदासाठी तिकिट देणार नाही. पक्षांतील निष्ठावान आणि जुन्या जाणत्या कार्यकर्त्यालाच बळ देईल, त्याला नगरसेवक म्हणून निवडून आणेल अशी गर्जना आज धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आ.गोटेंनी भाजपाच्या पदाधिकार्यांची सर्किट हाऊसला रितसर बैठक बोलविली. या बैठकीला भाजपाच्या जिल्हाध्यक्षांसह चार उपाध्यक्षांनी आणि काही पदाधिकार्यांनी दांडी मारल्याचे वृत्त आहे. या बैठकीला लखन भतवाल, भिमसिंग राजपूत, संभाजी पगारे, सुनिल नेरकर, संजय पाटील, योगेश मुकूंदे, अॅड.अमित दुसाणे, अमोल मराठे, जितेंद्र धात्रक,अमित दुसाणे, अमित खोपडे,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष कुणाल चौधरी,जिल्हाउपाध्य शशि मोगलाईकर, अजय अग्रवाल, यशवंत येवलेकर, ओम खंडेलवाल ,नगरसेविका श्रीमती वालीबेन मंडोरे, सौ.वैभवी दुसाणे, संजय बोरसे, सागर कोडगीर, मनोज शिरोळे, संदीप बैसाणे, अमोल धामणे, किरण देशमुख, हेमंत मराठे, स्वप्नील लोकरेंसह दीडशे ते दोनशे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार-खासदार मतभेदाने कार्यकत्यांची कोंडी
मोराणे शिवारातील साक्रीरोडवरील सर्किट हाऊस येथे सकाळी 11 वाजता पदाधिकार्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत पदाधिकार्यांनी तसेच काही कार्यकर्त्यांनी देखील आपली मतेमांडली. आमदार-खासदारांमध्ये मतभेद आहेत.त्यामुळे आमची कोंडी होते. आम्ही कोणाकडे जायचे असा सवाल काहींनी केला. त्यावर आ.गोटे म्हणाले की, पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाचाच असतो. तो याचा किंवा त्याचा नसतो. तसा मी भेदभाव कधी करत नाही आणि केलेलाही नाही. माझ्याकडे आला आणि नंतर दुसरीकडे गेला तरी त्याचे मला वाईट वाटत नाही. त्यामुळे तुम्ही पक्षाचे काम करत रहा. माझी मदत राहिलच.
आ.गोटेंच्या भूमिकेने राजकीय चर्चांना वेग
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आ.गोटेंना बळ दिल्यानेच आणि त्यांच्याकडे महानगरपालिका निवडणूकीची सुत्रे दिल्यानेच आ.गोटेंनी आज बैठक बोलावल्याची जोरदार चर्चा राजकिय वर्तुळात रंगत आहे. आतापर्यंत प्रत्येक वेळी पत्रकार परिषदा तसेच इतर कार्यक्रमांमध्ये ‘संघटनात्मक बाबींमध्ये’ मला रस नाही, असे सांगणार्या आ.गोटेंनी अचानक इंटरेस्ट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वरिष्ठ पातळीवरुन काहीतरी निर्णय झाला असावा त्यामुळेच आ.गोटेंनी पदाधिकार्यांना रितसर पत्र पाठवून भाजपाच्या पदाधिकार्यांची बैठक बोलवल्याचे बोलले जात आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दांडी मारली असली तरी त्यांनी बैठकीला घरगुतीकारणामुळे हजर न राहत असल्याबद्दलचे लेखी कळविले असल्याचे सांगितले जात आहे.
सत्तेत आल्यावर मुलभूत सुविधा देणार
धुळ्यातील रस्त्यांच्या आणि मुलभुत सोयी सुविधांबाबत पदाधिकार्यांनी तक्रार केली असता,महानगरपालिका आपल्या ताब्यात नाही. मनपा निवडणूकीची सुत्रे माझ्याकडे आली तर भाजपाचा भगवा मनपावर फडकेल. मनपात सत्ता आल्यानंतर धुळ्यातील रस्तेच काय,असुविधा नामशेष होतील. धुळ्यातील 535 कि.मी. लांबीचे रस्ते चकाचक होतील,पिण्याचे पाणी धुळेकरांना वेळेवर मिळेल. दुसर्या पक्षातुन भाजपात आलेल्या एकालाही तिकिट देणार नाही. पक्षातील फाटक्यापण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणार्या कार्यकर्त्याला तिकिट मिळेल. त्याला निवडून आणले जाईल. 30 सप्टेबर ते 10 ऑक्टोंबर दरम्यान दिल्लीत बैठक असून या बैठकीत मनमाड-इंदौर रेल्वेबाबत महत्वाचा निर्णय होणार असल्याचे सांगितले.