नवजात अर्भक सोडून माता पसार
सांगवी बु.॥ ते भालोद रस्त्यावर आढळले स्त्री जातीचे अर्भक : यावल तालुक्यात खळबळ
यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक ते भालोद रस्त्यावर स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी शेतमजूर महिलांना नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज आल्याने हा प्रकार उघडकीस आला. हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्मल्याचा संशय असून या प्रकरणी अज्ञात मातेविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांनी पोलिसांना माहिती देत बालकास रुग्णालयात तपासणी करीत जळगाव हलवले आहे.
अर्भक आढळल्याने उडाली खळबळ
यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक ते भालोद दरम्यान जाणार्या रस्त्यावर नवनाथ बाबा मंदिर आहे. मंगळवारी सकाळी या मंदिराजवळील हरी बोरोले यांच्या शेतालगत असलेल्या झुडपात लहान बालकाचा रडण्याचा आवाज येत असल्याने सांगवी बुद्रुक येथील शेती कामास जाणार्या महिलांनी त्या ठिकाणी जावून पाहिल्यानंतर एका पिशवीत स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळले. यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना माहिती कळवल्यानंतर अर्भकास यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी या नवजात बालिकेवर वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, अधिपरीचारिका मंजुषा कोळेकर, पिंटू बागुल, भूषण गाजरे आदींनी उपचार केले. अधिक उपचारासाठी अर्भकास जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिशु विहारात महिला पोलीस कर्मचारी ज्योती खराटे, सीमा चिखलकर यांच्या वतीने हलविण्यात आले. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात महिलेविरुद्ध लक्ष्मी धनराज भील (रा.सांगवी बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण करीत आहेत.