नवजीवन एक्स्प्रेसचा अपघात टळला ; रेल्वे कर्मचार्‍याची सतर्कता कामी

0

स्प्रिंग तुटल्याने एक्स्प्रेस माघारी ; दोन तासांच्या विलंबानंतर गाडी रवाना

भुसावळ- रेल्वे कर्मचार्‍याने दाखवलेल्या सतर्कतेमुळे अप नवजीवन एक्स्प्रेसचा गुरुवारी अपघात टळला तर स्थानकावरून सोडण्यात आलेल्या एक्स्प्रेस पुन्हा माघारी बोलावण्यात आल्यानंतर दोन तासांच्या बिघाड दुरुस्तीनंतर अहमदाबादकडे मार्गस्थ करण्यात आली. रेल्वे कर्मचार्‍याने दाखवलेल्या सतर्कतेचे कौतुक आहे.

स्प्रिंग तुटल्याने गाडी बोलावली माघारी
भुसावळ स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर गुरूवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस आल्यानंतर ती 8.15 वाजता अहमदाबादकडे निघाली असतानाच स्थानकाबाहेर गाडीचे ऑब्जर्वेशन (तपासणी) होत असताना जितेंद्र मसाले या कर्मचार्‍याला गाडीच्या बोगी क्रमांक पाचची स्प्रिंग तुटली असल्याचे आढळताच त्याने वरीष्ठांना माहिती कळवण्यात आल्याने वायरलेस संदेश देत एक्स्प्रेस थांबवण्यात आली. गाडीचे अर्धे डबे बाहेर तर अर्धे प्लॅटफार्ममध्येच असतानाच प्रवाशांनाही नेमकी गाडी का थांबवण्यात आली याची माहिती न कळाल्याने त्यांनी एकमेकांना विचारपूस सुरू केली तर लागलीच गाडीदेखील माघारी बोलावण्यात आल्याने प्रवाशांचा संभ्रम वाढला. वरीष्ठांच्या कल्पनेनंतर तातडीने इंजिनिअरींग विभागाच्या अधिकार्‍यांनी स्थानकावर धाव घेत पाहणी केली तर तुटलेला स्प्रिंग बाजूला करून दोन तासानंतर ही गाडी अहमदाबादकडे मार्गस्थ झाली. या प्रकारामुळे प्रवाशांना काहीसा मनस्ताप झाला असलातरी संभाव्य अपघात टळल्याने प्रवाशांमधून रेल्वे कर्मचार्‍याच्या सतर्कतेचे कौतुकही करण्यात आले.