नवी दिल्ली : पंजाबमध्ये अमरिंदर सिंह सरकारच्या शपथ ग्रहण सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. हा सोहळा गुरूवारी असून पंजाब सरकारमधील मंत्र्यांची अंतिम यादीही तयार झाली आहे. भाजपाला रामराम करून निवडणुकीदरम्यान काँगे्रसमध्ये दाखल झालेले माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिध्दू यांची अमरिंदर सिंह मंत्रीमंडळात मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. सिध्दू उपमुख्यमंत्री होणार अशीही चर्चा असली तरी या वृत्तास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
अमरिंदर सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये ब्रह्म महिंद्रा, नवज्योत सिंह सिध्दू, मनप्रीत सिंह बादल, साधु सिंह धर्मसोत, राणा गुरजीत सिंह, राजिंदर बाजवा, चरणजीत सिंह चन्नी यांचा समावेश असणार आहे. याशिवाय रजिया सुल्ताना, अरूणा चौधरी, ओमप्रकाश सोनी, राकेश पांडे यांना राज्यमंत्री पद मिळू शकते. पंजाब काँग्रेसच्या प्रभारी अशा कुमारी यांनी सांगितले की, अमरिंदर सिंह यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देखील उपस्थित राहणार आहेत.