बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला धूळ चारत भाजपाने आपली सत्ता कायम राखली. या मिळालेल्या यशानंतर मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांच्यासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. जिंकलेल्या आमदारांना मंत्री बनविण्यात येईल असं येडियुरप्पा यांनी म्हटलं होतं पण विजयी आमदारांच्या मनात वेगळचं राजकारण शिजत असल्याचं दिसून येत आहे. फक्त मंत्रिपद नव्हे तर महत्त्वाची खाती द्यावीत अशी मागणी निवडून आलेल्या आमदारांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडे केली आहे.
५ डिसेंबर रोजी कर्नाटकात झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल ९ डिसेंबर रोजी लागले. भाजपा १५ पैकी १२ जागांवर विजय मिळवित कर्नाटकात स्थिर सरकार आणलं. या जागांवर जिंकलेले भाजपा आमदार हे काँग्रेस-जेडीएस या पक्षातील बंडखोर आहेत. येडियुरप्पा सरकार बनविण्यासाठी ७ आमदारांची गरज होती. या पोटनिवडणुकीतील निकालामुळे कर्नाटकात भाजपाचं मजबूत सरकार आलं. निकाल येताच येडियुरप्पा यांनीही जिंकणाऱ्या आमदारांना मंत्री बनविण्याची घोषणा केली.
येडियुरप्पा यांनी सांगितले होते की, विजयी १२ आमदारांपैकी ११ जणांना कॅबिनेट मंत्री बनविण्यात येईल. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे आमदार फक्त मंत्रिपदावर समाधानी नाहीत तर त्यांना गृह, सार्वजनिक बांधकाम, सिंचन, उर्जा यासारखे महत्त्वाची खात्याची मागणी त्यांनी येडियुरप्पा यांच्याकडे केली आहे. नवनिर्वाचित आमदारांनी केलेल्या मागणीमागे कारण सांगितले जात आहे की, येडियुरप्पा सरकार त्यांच्या पाठिंब्यावर चालणार आहे. त्यामुळे या आमदारांना महत्त्वाची खाती हवीत. तसेच जे तीन नेते पराभूत झाले त्यांनाही डावलून चालणार नाही. पोटनिवडणुकीत नागराज, विश्वनाथ आणि रोशन बेग यांचा पराभव झाला आहे.