नवप्रकाश योजनेतून वीज ग्राहकांना मिळणार दिलासा

0

भुसावळ। महावितरण कंपनीने कायमस्वरुपी विजपुरवठा खंडीत झालेल्या ग्राहकांसाठी नवप्रकाश योजना सुरु केली आहे. या योजनेला मार्च अखेरऐवजी आता 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेतून बिलांवरील व्याज विलंब आकारात सुट मिळवून वीजबिल भरल्यास पुन्हा जोडणी घेता येणार आहे. महावितरण कंपनीने थकीत आणि कायम स्वरुपी विजपुरवठा खंडीत झालेल्या वीजग्राहकांसाठी नवप्रकाश योजना सुरु केली होती.

व्याज विलंब आकारात 100 टक्के सुट
या योजनेला 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र यास प्रतिसाद वाढत असल्याने महावितरण कंपनीने या योजनेला 31 जुलै पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. या योजनेत थकीत विजबिल ग्राहकांनी 30 एप्रिलपर्यंत मुळ थकबाकी भरल्यास व्याज विलंब आकारात 100 टक्के सुट मिळवता येणार आहे. यासह 31 मार्च 2016 पूर्वी कायम स्वरुपी विजपुरवठा खंडीत झालेले सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजनेच्या ग्राहकांना वगळून अन्य उच्च लघुदाब वीजग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

लोक अदालत आणि न्यायप्रविष्ट प्रलंबीत थकबाकी प्रकरणातील हूकूमनामा मंजूर होऊन 12 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या थकबाकीदार ग्राहकांनाही या योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेची माहिती सर्वसामान्य ग्राहकांना मिळावी, म्हणून महावितरणतर्फे जनजागृतीसाठी उपाय केले जात आहेत. भुसावळ शहरात नवप्रकाश योजनेतून 92 ग्राहकांनी सहभाग नोंदवला आहे. यातून महावितरण कंपनीला 7 लाख 78 हजार रुपयांच्या थकित बिलांची वसुली झाली. मार्च अखेरपर्यंत आणि मुदतवाढीच्या काळात तब्बल 300 ग्राहक या योजनेत सहभाग घेतील, असा अंदाज आहे. शहरातील घरगुती वीज ग्राहकांसह आता योजनेत कृषी ग्राहकांनाही सहभाग घेता येणार आहे.