नवभारत निर्मितीमध्ये योगदान द्या : मुख्यमंत्री फडणवीस

0

पुणे । गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवभारत निर्मितीची संकल्पना दिली आहे. भ्रष्टाचारमुक्त, दहशतवाद, जातीयता व अस्वच्छता मुक्त भारत आपल्याला घडवायचा आहे, त्यामुळे गणेशचरणी या निमित्ताने आपण संकल्पित व्हा आणि नवभारत निर्मितीमध्ये योगदान द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशभक्तांना केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त फडणवीस यांच्या हस्ते ब्रह्मणस्पती मंदिराच्या विद्युतरोषणाईचे उदघाटन झाले. यावेळी खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुनील रासने, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना आपल्यामुळे उत्साह मिळाला आहे. याबद्दल आपले आभार, अशा शब्दांत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.