नागपूर । विघ्नहर्त्याच्या आनंदावरच स्वाइन फ्लूच्या विघ्नाने विरजण घातले होते. त्यापाठोपाठ नवरात्रीच्या उत्सवावरही स्वाइनचे सावट दाटल्याने पुन्हा एकदा नागपूरकरांचा श्वास अडचणीत आला आहे. तीन दिवसांत या आजाराने आणखी तीन जणांचा मृत्यू ओढवला आहे. 22 जणांना या आजाराची लागण झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. नवरात्रीच्या महोत्सवात गरबामुळे गर्दी वाढते. त्यामुळे स्वाइन फ्लूची वेगाने लागण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
तीन दिवसांत स्वाइन फ्लूने दगावलेल्या तीन जणांमुळे मृत्यूचा आकडा 63 वर पोचला आहे. करिष्मा ठाकूर (वय 27, रा. हिंगणा मार्ग, साईराम कॉलनी), रवींद्र यादव (वय 30, रा. इमालिया, जबलपूर) आणि वैभव घायडे (वय 32, रा. मारोळी, मौदा) अशी दगावलेल्या रुग्णांची नावे आहेत.