वारस हक्कासाठी मागितली होती पाचशे रुपयांची लाच : तहसीलदारांसह सर्कलांची चौकशी
धुळे – तालुक्यातील नवलनगरचे तलाठी चंद्रकिरण रायभान साळवे (42, रा.पाथर्डी रोड, नाशिक) यांना शेतजमिनीच्या वारस हक्कातील नाव कमी करण्यासाठी 500 रुपयांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी नवलनगर येथे रंगेहाथ अटक केली होती. आरोपीस मंगळवारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्यापुढे तहसीलदार अजय मोरे व सर्कल बोरसे यांची मंगळवारी कसून चौकशी करण्यात आली व त्यांनी समाधानकारक उत्तर दिल्याचे माळी यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.
पाचशे रुपयांची लाच घेताना कारवाई
नवलनगर येथील तक्रारदार शेतकर्याची गट क्रमांक 102/1 मध्ये सुमारे एक हेक्टर 36 आर वडिलोपार्जित शेती आहे. या शेतजमिनीच्या वारस हक्कातील वारसाचे नाव कमी करण्यासाठी शेतकर्याने 10 ऑगस्ट रोजी रजिस्टर कार्यालयात अर्ज केला होता. हा अर्ज चौकशीसाठी साळवे यांच्याकडे आला होता. त्यानंतर संबंधित शेतकर्याने साळवे यांची शुक्रवारी भेट घेत या कामासाठी 500 रुपयांची लाच मागितली व त्यानंतर शेतकर्याने एसीबीकडे तक्रार नोंदवली. सोमवारी पथकाने सापळा रचल्यानंतर आरोपी तलाठ्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. तलाठी साळवे यांच्या नाशिकमधील पाथर्डी रोड परीसरातील घराची नाशिक एसीबीने झडती घेतली मात्र त्यात आक्षेपार्ह काहीही आढळून आले नाही.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेककर, पोलीस पवन देसले, हवालदार नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संदीप सरग, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, सतीश जावरे, शरद काटके, कृष्णकांत वाडिले, कैलास जोहरे, भूषण खलाणेकर, सुधीर सोनवणे, प्रकाश सोनार, संदीप कदम, सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.