नववर्षदिनी लक्ष्मीच्या पावलांनी घरी येणार कन्यारत्न!

0

बेंगळुरू : 1 जानेवारीला जन्माला येणारी मुलगी ’लक्ष्मी’च्या पावलानं घरी येणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय बेंगळुरू महापालिकेने घेतला आहे. सध्या अजूनही काही ठिकाणी वंशाचा दिवा हवा यासाठी मुलाचा आग्रह धरला जातो. पण स्त्रीजातीचे अर्भक असल्यास अनेकदा त्या अर्भकाची भ्रूणहत्या केली जाते. असा प्रकार सर्रास घडत असल्याचे समोर आले. मात्र, आता 1 जानेवारीला मुलगी जन्माला आल्यास संबंधित बालिकेच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मिळणार आहे. हे पाच लाख रुपये मुलीच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून दिले जाणार आहे.

कर्नाटकातील बेंगळुरू महापालिकेच्यावतीने ही नवी योजना आणण्यात आली. नववर्षाच्या सुरवातीला म्हणजे 1 जानेवारीला मुलगी जन्मास आल्यास 5 लाख रुपये दिले जाण्याचा विचार आहे. हे 5 लाख रुपये मुलीच्या भविष्यासाठी देण्यात येतील. याबाबतची माहिती महापौर आर. संपत राज यांनी दिली. तसेच महापालिकेच्यावतीने देण्यात येणारे 5 लाख रुपये महापालिका आयुक्त आणि मुलीच्या संयुक्त बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.