दोन्ही डीव्हीआरसह 38 हजारांची रोकड लांबवली ; नववर्षाच्या प्रारंभालाच धाडसी चोर्यांमुळे सराफा बांधवांमध्ये प्रचंड घबराट
यावल- शहरात भरवस्तीत असलेल्या मुख्य रस्त्यावरील तीन सराफा दुकानांसह एका कापड दुकानात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न करून नववर्षाच्या प्रारंभीच चोरट्यांनी पोलिसांना सलामी देत पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुदैवाने सराफा दुकानांचे शटर न उघडल्याने लाखोंचे दागिने सुरक्षित राहिले अन्यथा सराफा व्यापार्यांना मोठा फटका बसला असता. ठसे तज्ज्ञांनी चोरट्यांचे ठसे घेतले असून श्वान जागीच घुटमळल्याने चारचाकीतून चोरटे आल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी 38 हजारांच्या रोकडसह दोन दुकानातील डीव्हीआर लांबवल्याने चोरटे सराईत असल्याचा अंदाज असून त्यांनी चोरीपूर्वी या परीसराची रेकी केली असावी, अशी शक्यता आहे.
चार दुकानांना चोरट्यांनी केले टार्गेट
शहरातील मुख्य रस्त्यावरील अशोका रेडीमेड, समर्थ ज्वेलर्स, सतीश सोनार यांचे दगडूशेठ सोनार ज्वेलर्स, जगदीश कवडेवाले यांचे आजीराव काशिदास कवडीवाले ज्वेलर्स, महाजन मेडीकल या दुकानांना बुधवारी पहाटे चोरट्यांनी टार्गेट केले. महाजन मेडीकल व कवडीवाले ज्वेलर्स यांचे दुकान केवळ फोडण्याचा प्रयत्न झाला तर सराफा दुकानांचे शटर तोडल्यावर आतदेखील सुरक्षा म्हणुन लाकडी फळ्या व चॅनल गेट असल्याने चोरट्यांना आत शिरणे शक्य झाले नाही तर समर्थ ज्वेलर्सच्या दुकानातुन व अशोका रेडीमेडमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्यांचे मशीन डी.व्ही.आर. चोरट्यांनी पळवले तसेच अशोका ज्वेलर्समधून 37 हजार 800 रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली.
चोरीनंतर पोलिसांनी घेतली धाव
चोरीची माहिती मिळताच घटनास्थळी पहाटे पाच वाजेला पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजीत ठाकरे, सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, संजय देवरे यानी भेट देवुन पाहणी केली व परीरसरातील नागरीकांशी विचारपूस केली तर दुपारी जळगाव येथुन ठसे तज्ज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन गांगुर्डे, डॉग स्कॉड पथकासह उपनिरीक्षक शामराव सोनुले, हवालदार संदिप परदेशी पथकासह दाखल झाले. चोरट्यांचे ठसे घेण्यात आले असून श्वानाद्वारे चोरट्यांचा मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला.