नववर्षाच्या प्रारंभीच भुसावळकरांना टंचाईच्या झळा

0

भुसावळ : तब्बल 104 कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे हतनूर धरणातून आवर्तन रखडल्याने नववर्षाच्या प्रारंभीच शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाटबंधारे विभागाच्या आडमुठे धोरणाविरुद्ध संताप व्यक्त होत असून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे. पाणी वापर संस्थांसह भुसावळ पालिका, रेल्वे, दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आणि जळगाव एमआयडीसीकडे 103 कोटी 91 लाख रुपये थकबाकी वाढल्याने हतनूरमधून आवर्तन बंद करण्यात आले आहे. नववर्षाच्या प्रारंभीच सोमवार, 1 जानेवारी रोजी शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने ऐन हिवाळ्यात शहरवसीयांना टंचाईच्या झळा जाणवू
लागल्या आहेत.

थकबाकी रखडल्याने आवर्तनास विलंब
पाटबंधारे विभागाच्या हतनूर धरणावरुन पाणीपुरवठा करणार्‍या मध्य रेल्वे भुसावळ व दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, एमआयडीसी जळगावकडे या बिगर सिंचन पाणीपुरवठा योजनांकडे तब्बल 103 कोटी 91 लाखांची पाणीपुरवठा शुल्काची रक्कम थकीत आहे. जलसंपदा व पाटबंधारे विभागाने वारंवार अल्टीमेटम देवूनही थकबाकी भरली जात नसल्याने हतनूरमधून सोडण्यात येणार आवर्तनही थांबविण्यात आले. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तापी पात्रातील बंधार्‍याची जलपातळी घसरल्याने गेल्या दहा दिवसांपासून शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात होता मात्र नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी सात वाजता जॅकवेलच्या इनलेटखालपर्यंत जलपातळी गेल्याने पाणीपुरवठा योजनेवरील रॉ वॉटरचे 300 अश्वशक्तीचे दोन्ही पंप बंद करण्यात आले आहेत. यामुळे सोमवारपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला. तो किमान आठवडाभर पूर्वपदावर येणार नसल्याची चिन्हे आहेत. यामुळे पालिका आणि नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

आज आवर्तन सुटणार -नगराध्यक्ष भोळे
हतनूर धरणातून आवर्तन सोडण्यासंदर्भात संबंधित विभागाशी चर्चा करण्यात आली. मंगळवारी धरणातून आवर्तन सुटल्याने तीन दिवसात शहराचा पाणीप्रश्‍न सुटेल, असे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले. पाण्याअभावी पंप बंद करण्यात आल्याचे ते म्हणाले.