नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा सज्ज

0

लोणावळा : सरत्या वर्षाला निरोप व नविन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात येणार्‍या पर्यटकांच्या स्वागतासाठी लोणावळा सज्ज झाला आहे. येथील बहुतांश हॉटेल, खाजगी बंगले, सेनेटोरियम यांची आगाऊ बुकिंग झाली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी येणार्या पर्यटकांनी शहरात कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन लोणावळा शहर पोलीसांनी केले आहे.

मद्यपी वाहनचालकांना पकडणार
शहरात मद्यपान करुन सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करुन धांगडधिंगा घालणारे तळीराम, मद्यपान करुन वाहतुक नियमांचा भंग करत वाहन चालविणारे चालक यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे. पर्यटनस्थळांवर जाण्यास रात्रीच्या वेळी बंदी असल्याने कोणीही धोकादायकपणे भुशी धरणाच्या वरील डोंगर, लायन्स पॉईट अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करु नये, आपल्यामुळे इतरांना त्रास होऊन असे वर्तन करु नये. शहरातील वातावरणांचा आनंद घेत नववर्षाचे स्वागत हे उत्साहपुर्ण व आनंदमय वातावरणात करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

विविध ठिकाणी नाकाबंदी
तळीरामांच्या स्वागतासाठी लोणावळा पोलीस सज्ज झाले असून अतिरिक्त पोलीस फौटा मागविण्यात आला आहे. कुमार चौक, रायवुड कॉर्नर, जकात नाका, भांगरवाडी याठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार असून ब्रिद अ‍ॅनालाईझर मशिनद्वारे वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभुमीवर हॉटेल व्यावसायीक व बंगलेधारकांनी येणार्या पर्यटकांची ओळखपत्रे व नोंदी करुन घ्याव्यात तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सिसीटिव्ही लावून घ्यावेत अशा सुचना पोलीस प्रशासनाने हॉटेल व्यावसाईकांची बैठक घेत दिल्या आहेत. सोबत 31 डिसेंबरच्या रात्री साडेबारा वाजेपर्यत वाद्य परवाना असल्याने यानंतर वाद्यकाम न थांबविल्यास कारवाई करणार असल्याची सुचना जारी केली आहे.