नववर्षानिमित्त साई भक्तांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध

0

अहमदनगर : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला अनेक भाविक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. या भाविकांना शिर्डीत सर्व सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी साई संस्थानकडून तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

वर्षाच्या अखेरच्या दिवशी 31 डिसेंबरला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 1 जानेवारीला भाविकांना साईंच्या समाधीचे दर्शन मिळावे, यासाठी नेहमीच्या वर्षासारखे यंदाही साई समाधी मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साई संस्थाने घेतला आहे. तसेच प्रथम उपचार केंद्र अशा अनेक सुविधा साई संस्थानकडून भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नवीन वर्षानिमित्ताने शिर्डीत लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करत असतात. यामुळे शिर्डीतील साई संस्थांचे भक्त निवास हाऊस फुल्ल होते. त्यामुळे भाविकांची राहण्याची गैर सोय होऊ नये यासाठी 4 ते 5 ठिकाणी भाविकांना राहण्यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. साईबाबांचा लाडूचा प्रसाद भक्तांना मिळावा, म्हणून विविध ठिकाणी लाडू काउंटर देखील साई संस्थानकडून उभारले आहेत.

दरम्यान, नवीन वर्षानिमित्ताने साईबाबांच्या मंदिराला विविध प्रकारची रोषणाई करण्यात आली आहे. साई मंदिर तसेच मंदिर परिसरात विविध प्रकारच्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे.