जळगाव । लग्नसोहळा म्हटले की, सर्वसाधारणपणे नातेवाईक, मित्र, आप्तेष्टांकडून नवविवाहित दाम्पत्यांस रोख रक्कम, संसारोपयोगी भांडी, कपडे, पुष्पगुच्छ अशा विविध वस्तु भेट दिल्या जातात. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देऊन जळगावचे जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी एक अतिशय अभिनव संकल्पना राबविली आहे. आज ते जळगावातील एका विवाह सोहळ्यास उपस्थित राहिले असता त्यांनी नवविवाहित दाम्पत्यांस यापैकी काहीही भेट न देता चक्क हेल्मेट भेट देऊन समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे.
नवविवाहित दाम्पत्यांला दिल्या शुभेच्छा
याबाबत बोलतांना पोलिस अधिक्षक श्री कराळे म्हणाले की, सध्याचे युग हे धावपळीचे युग आहे. त्यातच माध्यम प्रतिनिधींना तर सतत बातमीसाठी धावपळ करावी लागते. धावपळ करीत असताना माणसे आपल्या सुरक्षिततेला फारसे महत्व देत नाही. ही बाब लक्षात घेऊन या नवविवाहित दाम्पत्याचे आयुष्य सुखी आणि सुरक्षित जावो असा मला संदेश द्यायचा होता. साधारणपणे आपण अशा सोहळयामध्ये वधुवराला पुष्पगुच्छ भेट देतो. परंतु एक -दोन तासानंतर पुष्पगुच्छ फेकुन दिला जातो. परंतु याच किमतीचे आपण हेल्मेट जर भेट दिले तर यामुळे त्या व्यक्तीचे पुढील किमान पाच वर्षाचे आयुष्य तर नक्कीच सुरक्षित राहू शकते. या उद्देशातून ही कल्पना सुचली आणि आज त्याची अंमलबजावणी केल्याचे त्यांनी सांगितले.
घडवला नवा आदर्श
येथील ईबीएम न्युज चॅनलचे प्रतिनिधी जुगल पाटील यांचा विवाह सोहळा आज शहरात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या विवाह सोहळ्यास जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी उपस्थित राहून या नवविवाहित दाम्पत्यांला भावी आयुष्य सुखा समाधानाचे जावो अशा शुभेच्छा तर दिल्याच त्याचबरोबर त्यांचे भावी आयुष्य सुरक्षिततेचे जाण्यासाठी त्यांना हेल्मेट भेट दिले. याप्रसंगी त्यांचेसोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुनील कुर्हाडे उपस्थित होते.