नववीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची होणार फेरपरिक्षा!

0

जळगाव । नववीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून यंदा फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे़ शाळांनी ही फेरपरीक्षा जुन महिन्याच्या अखेरपर्यंत घ्यावी, अशा सुचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्या असल्यामुळे परीक्षेद्वारे नववी नापास विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊन दहावीच्या वर्गात बसण्याची संधी मिळणार आहे. या संबंधीचे आदेश पंधरा दिवसांपूर्वीच जळगाव शिक्षण विभागाला मिळाले असून त्यानुसार शाळांना सुचना केल्या असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी सांगितले़

दहावीत प्रवेश मिळणार
मागील वर्षी 2017 मध्येच शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला होता़ त्यानुसार यंदा पहिल्यांदाच नववीच्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा होणार आहे. 15 जुनला शाळा सुरू झाल्यानंतर एखाद्या विषयात अनुर्त्तीण झालेल्या विद्यार्थ्यांना त्या-त्या विषयाचा अभ्यास पुन्हा करावा लागणार आहे़ फेरपरीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरच विद्यार्थ्यास दहावीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे़

शाळांना सुचना
विद्यार्थ्यांना नववीचा निकाल कळवितानाच फेर परीक्षेच्या तारखा कळवायच्या आहेत. यासोबतच ही फेरपरीक्षा शाळा सुरू झाल्यानंतर जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याच्या सुचना केल्या आहेत़ याबाबत जळगाव शिक्षण विभागाला पंधरा दिवसांपूर्वीच आदेश प्राप्त झाले आहेत़ ज्या विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण आहे त्याच विषयाचा पेपर द्यावा लागणार आहे़

जूनच्या शेवटी परिक्षा
अनुत्तीर्ण झालेल्या विषयांसाठीच ही फेरपरीक्षा घेण्यात यावी, गंभीर आजाराने पीडित विद्यार्थ्यांना मानसिक दृष्ट्या दिव्यांगांसाठी तयार केलेल्या मूलभूत संबोध प्रश्‍नावलीची सवलत द्यावी, जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत परीक्षा घ्यावी, फेरपरीक्षेसाठी मूल्यमापन पध्दती ही नववीसाठी असलेल्या सरासरी पध्दतीप्रमाणेच राहील, मानसिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना नववीतील मूलभूत संबोधांवर आधारित प्रश्‍नपत्रिका आवश्यकता भासल्यास तयार करावी, अशा सुचना माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांनी दिल्या आहेत़