उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
कोल्हापूर : हे सरकार म्हणजे नवसाचे पोर आहे. त्यामुळे नवसाचे पोर जर उडाणटप्पू निघाले तर बोलायचे कुणाला? अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. ठाकरे कोल्हापूर दौर्यावर असून, त्यांनी यावेळी स्थानिक उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार विनायक राऊत, खासदार गजानन किर्तीकर उपस्थित होते.
जाहिरातीकरून जनतेची फसवणूक
सरकारच्या धोरणामुळे जेरीस आलेल्या उद्योजकांनी आंदोलन छेडल्यास मी स्वतः त्याचं नेतृत्व करेन. सरकारने शेतकरी, उद्योजक आणि व्यापार्यांना देशोधडीला लावलेले असले तरी रामदेवबाबांसारखे नवे उद्योजकही पुढे येत आहेत, अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. आपण खूप काही तरी करतोय असा आभास निर्माण करायचा आणि त्यावर जाहिराती करुन भोळ्याभाबड्या जनतेला फसवायचे आणि पुढे आपले चालू ठेवायचे ही सरकारची व्याख्या माझी नाही. ही लोकशाही मानायला मी तयार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्योजकांनी पेटून उठावे
चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, व्यापारी आणि औद्योगिक महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर, उद्योगपती चंद्रकांत जाधव यांच्यासह शहरातील उद्योजकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जीएसटी, नोटाबंदी, विजेचे दर याविषयीच्या अडचणी त्यांनी उद्धव यांच्यासमोर मांडल्या. उद्योजकांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर हतबल होऊन गप्प बसण्यापेक्षा पेटून उठायला हवे. गुजरातचे व्यापारी जीएसटीविरोधात लढत असताना आपण का गप्प बसायचे ? असा सवाल करताना राज्यातील उद्योजकांची रस्त्यावर उतरण्याची तयारी असेल तर त्यांचे नेतृत्व मी करेन. महाराष्ट्र हे शिवरायांचे राज्य आहे. त्यामुळे कण्हत बसण्यापेक्षा राज्यातील व्यापारी, शेतकर्यांनी रस्त्यावर उतरुन लढण्याची तयारी करावी. चुकीच्या गोष्टींवर आपण गप्प बसणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
दुटप्पीपणाचा पहिला फटका सेनेला बसला
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील जगातील सर्वात मोठ्या प्रस्तावित रिफायनरीच्या मोजणीला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशीही शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी आंदोलनाकडे फिरकले नाहीत. दुटप्पीपणाचा आरोप केल्याने शिवसेना आमदार राजन साळवींना बैठकीतून काढता पाय घ्यावा लागला. अवघ्या 8 दिवसांपूर्वी कोकणात येऊन आम्ही या प्रकल्पाविरोधात नागरिकांसोबत आहोत, अशी घोषणा करणार्या उद्धव ठाकरेंनी नेमके काय केले, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला. नाणर रिफायनरी प्रकल्पासाठी परिसरातील शेतकर्यांची 15 हजाराहून अधिक एकर जमीन सरकार अधिग्रहीत करणार आहे. त्यासाठी गेल्या 5 दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने जमीन मोजणीला सक्तीने प्रारंभ केला होता. मात्र स्थानिक जनतेने रस्त्यावर उतरत जमीन मोजणी होऊ दिली नाही. हे आंदोलन बिगरराजकीय असल्याचे सांगत ग्रामस्थांनी अधिकार्यांना रोखून धरले.