दोन विद्यार्थ्यांना अटक
लाहोर : पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भरसभेत धार्मिक कट्टरपंथीय विद्यार्थ्याने बूट फेकून मारला. येथील विद्यालयातील एका कार्यक्रमात भाषण करतेवेळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अब्दुल गफूर असे बूट फेकण्यार्याचे नाव आहे. याअगोदर पंजाब प्रांतात पाकिस्तानचे विदेश मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या चेहर्यावर एका धार्मिक कट्टरपंथी व्यक्तीने शाई फेकली होती.
शरीफ यांच्यासमोर घोषणाही दिल्या
शरीफ हे जामिया नामीया विद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. ज्यावेळी ते विद्यार्थ्यांसमोर बोलण्यासाठी उभे राहिले. यावेळी या विद्यार्थ्याने हे कृत्य केले. बूट फेकून मारल्यानंतर त्याने शरीफ यांच्यासमोर उभे राहून घोषणा देखील दिल्या. या घटनेनंतर तत्काळ 2 विद्यार्थ्याना पोलिसांनी अटक केली. अब्दुल गफूर या विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. तर त्याचा साथीदार साजीद यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पाक परराष्ट्र मंत्र्यांला काळे फासले
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या चेहर्याला काळे फासण्यात आल्याची घटना घडली आहे. पंजाब प्रांतात पक्ष कार्यकर्त्यांच्या संमेलनाला संबोधित करताना ही घटना घडली. शाई फेकणारा व्यक्ती कट्टरतावादी असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केली. त्यानंतर आसिफ यांच्या सुरक्षारक्षकांनी त्याला बाहेर नेले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, चेहरा धुवून आसिफ यांनी आपले भाषण पूर्ण केले. ख्वाजा आसिफ यांच्या पक्षाने संविधानाच्या माध्यमातून पैगंबर मोहम्मद हे इस्लामचे अखेरचे धर्मगुरू आहेत ही मान्यता बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या, असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने सांगितले. मी या व्यक्तीला ओळखत नाही. माझ्या विरोधकांनी काही पैसे देवून त्याला शाई फेकायला सांगितले होते असे वाटते, पण मी त्याला माफ करतो आणि पोलिसांना त्याला सोडून देण्याचे आवाहन करतो असे आसिफ म्हणाले.