नवाझ शरीफ पायउतार!

0

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पनामा घोटाळाप्रकरणात निर्णय सुनावताना पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दोषी ठरविल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात एकच भूकंप आला. पाच सदस्यीय न्यायपीठाने हा निर्णय देताना, शरीफ यांच्याविरुद्ध खटला चालविण्याची शिफारस केली. तसेच, त्यांना पंतप्रधानपदावरही अपात्र घोषित केले. त्यामुळे शरीफ यांनी राजीनामा देत, न्यायालयीन व कायदेशीर लढाई घटनेच्या चौकटीत लढू असे जाहीर केले. काळा पैसा पांढरा करणे, भ्रष्टाचार आणि अवैध सावकारी आदी आरोप शरीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सिद्ध झाले आहेत. इंटरनॅशनल कन्सॉर्टियम ऑफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट (आयसीआयजे)च्या काही पत्रकारांनी पनामातील मोसेक फोंसे या कायदेविषयक संस्थेचे सर्व्हर हॅक करून गुप्त माहिती चव्हाट्यावर आणली होती. जवळपास एक कोटी 10 लाख दस्तावेज विविध प्रसारमाध्यम संस्थांच्या 370 पत्रकारांनी जगजाहीर केले होते. पनामा पेपर लीक नावाने उघड झालेल्या या प्रकरणात शरीफ व त्यांच्या कुटुंबीयांच्या काळापैशाचीही माहिती जाहीर झाली होती. त्यावरून पाकिस्तानात एकच खळबळ उडाली होती.

तपास पथकाच्या अहवालात ठरले होते दोषी
पनामा पेपर लीक प्रकरणात पंतप्रधान नवाझ शरीफ व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध लंडनमध्ये अवैध संपत्ती गोळा करणे, काळापैसा जमविणे आदी आरोप आहेत. त्यात शरीफ व त्यांची मुलगी मरयाम आणि त्यांचा जावई यांनाही सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एजाज अफजल यांच्यासह पाच सदस्यीय न्यायपीठाने याप्रकरणी 21 जुलैला सुनावणी पूर्ण केली होती. तर शुक्रवारी संबंधितांना दोषी ठरविण्याचा निकाल देत लाभाचे पद सोडण्याचे आदेश दिलेत. तब्बल 70 देशांच्या 370 पत्रकारांनी पनामा केस प्रकरणी संशोधन केले होते. आठ महिने पत्रकार या घोटाळ्यांचा तपास करत होते. पनामा या चिमुकल्या देशाला ‘टॅक्स हेवन‘ असे म्हटले जाते. विदेशी व्यक्ती, गुंतवणूकदार, व्यापारी यांना या देशात गुंतवलेल्या पैशापोटी कोणताही कर लागत नाही. त्यामुळे शरीफ कुटुंबीयांसह भारतातील अनेकांनीही या देशात काळापैसा गुंतवलेला आहे. पनामा प्रकरण उघडकीस आल्यानंतर शरीफ यांचे राजकीय विरोधक व तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख इमरान खान यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून शरीफ व कुटुंबीयांविरुद्ध कारवाईची मागणी करत, त्यांना पदच्युत करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने न्यायालयाने संयुक्त तपास पथक (जेआयटी)ची स्थापनाही केली होती. या तपास पथकाला अहवाल देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, तपास पथकाने आपला अहवाल सादर करून, शरीफ व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात दोषारोप ठेवले होते.

शरीफ यांच्याकडे संसदेत बहुमत
पनामा पेपर लीकप्रकरणी जेआयटीचा अहवाल आल्यानंतरच शरीफ यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. या अहवालात शरीफ व कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत. तर हा अहवाल पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) या सत्ताधारी पक्षाने फेटाळून लावला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना पंतप्रधानपदावरून अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी राजीनामा देत केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त केले आहे. त्यामुळे पाकिस्तानात राजकीय गोंधळ निर्माण झालेला आहे. शरीफ यांच्या पक्षाला संसदेत बहुमत असल्याने पंतप्रधानपदासाठी नवीन नेता निवडावा लागणार असून, शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ, संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ, सरदार अयाज सिद्दिकी, अहसान इक्बाल, आणि गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा सुरु आहे. सत्ता पहिल्यांदाच शरीफ कुटुंबाबाहेर जाणार जाण्याची शक्यता असून, दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टीही संसदेत मजबूत स्थितीत नाही.

काय आहे पनामागेट प्रकरण?
पनामाच्या मोसेक फोन्सेका कंपनीची महत्वपूर्ण व गोपनीय कागदपत्रे लीक झाल्याने श्रीमंत व धनाढ्य नागरिक स्वत:ची संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे टॅक्स चोरतात? काय क्लुप्त्या लढवतात, यासंबंधीची माहिती समोर आली होती. या यादीत जगभरातील अनेक महत्वपूर्ण, धनाढ्य व्यक्ती, उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकारण्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, या यादीत 500 भारतीयांचीही नावेदेखील आहेत. मोसेक फोन्सेका आपल्या ग्राहकांना काळा पैसा पांढरा करण्यासाठी तसेच नियमांमधून वाचविण्यासाठी आणि करातून सूट मिळावी यासाठी कशा प्रकारे मदत करायची ही माहिती या कागदपत्रांमधून समोर आली होती.

ही कागदपत्रे लीक झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, सीरियामधील राष्ट्राध्यक्ष बशर अल असद, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुत्तो, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांनीदेखील संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे पनामाची मदत घेतली ही माहिती समोर आली होती. एकीकडे जगभरातील इतकी मोठे नावे समोर आली असताना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचे नावदेखील समोर आले होते. ब्लादिमीर पुतिन यांनी जवळच्या मित्रांची मदत करण्यासाठी पनामाचा वापर केल्याची माहिती उघड झाली होती. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनोल मेस्सीचादेखील यामध्ये समावेश आहे.