नवापुरात असामाजिक तत्वांचा वावर वाढला

0

नवापूर: शहरातील शाळा व महाविद्यालयाचा परिसरात वावर वाढल्याने शहरातील व ग्रामीण भागातील मुलींमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शाळा व महाविद्यालयाचा मैदानावर जाऊन हे मुलीसमोर मोटारसायकलीचा होर्न जोरात वाजवून सुसाट वेगात जातात मधल्या सुटीत व शाळा भरण्याचा सुटल्यावर ही असामाजिक तत्वे मुलींची छेड काढतांना दिसून येतात. यावेळी शाळेचे गेटमेनने त्यांना हटकले असता त्यांना धमकी दिल्याचे खळबळजनक प्रकार समोर येत आहेत. या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून सर्वसामान्य नागरिकांसह महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांचा वचक संपल्याने माथेफेरूंचा जोर अधिकच वाढला आहे. शहरातील जनता पार्क, मंगलदास पार्क, शेफाली पार्क या काॅलनी भागात तसेच शहरातील शितल सोसायटी, सराफ गल्ली, जुनी पोष्ट गल्ली आदी भागात दिवसा व राञीच्या सुमारास ही असामाजिक तत्वे मोटारसायकलचा होर्न वाजवत सुसाट वेगाने जातात. अनेकवेळा लहान मुलांना व वृध्दांना यांनी मोटारसायकलीने ठोस देऊन गंभीर जखमी केले आहे. माञ लोक या माथेफेरूंना घाबरून पोलिसांकडे तक्रार करायला घाबरतात. या माथेफेरूंचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी पालकांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या आहेत. याबाबत काही संस्थाचालकांनी देखील पोलीसांना यापूर्वी लेखी व तोंडी तक्रारी केल्याचे समजते.