नवापूर । नवापूर नगरपालिकेमार्फत ट्रेझरी ऑफीस ते नारायणपूर रोडच्या पुलापर्यंत नाल्यावरील भितींचे निकृष्ट बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नरेंद्र देविदास नगराळे यांनी केली आहे. जिल्हाधिकार्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिकेतर्फे केले गेलेले ट्रेझरी ऑफीस ते नारायणपूर रोडच्या पुलापर्यंत नाल्यावरील भिंतींचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दोन कोटीचे आहे काम
नाल्यावरील ट्रेझरी ऑफिस जवळील पुलाचे बांधकाम तसेच इंदिरा नगर रोड वरील पुलाचे बांधकाम रऊफ रशीद कुरेशी, प्रकाशा ता शहादा या मक्तेदारामार्फत केले जात आहे. कामाचे एस्टिमेट 2 कोटी पेक्षा जास्त आहे. मागील वर्षी पावसाळ्यात वाहुन आलेल्या पाण्याला नाल्यामध्ये निचरा न मिळाल्यामुळे पुराचे पाणी नाल्याच्या आजुबाजुच्या घरात शिरून नुकसान झाले होते. यामुळे हे काम उत्तम होणे आवश्यक आहे. मात्र इथे नगरपालिकेचे कर्मचारी नसल्याने मोठी कपची, रेतीमध्ये सिमेंटचे प्रमाण किती असायला पाहिजे याबाबत तपासणी होत नाही.
सिमेंट मध्ये रेतीचे प्रमाण अधिक !
सिमेंट मध्ये रेतीचे प्रमाण जास्त टाकुन सिमेंट कमी वापरत असल्यामुळे निकृष्ट बांधकाम असलेली भिंत कधीही तुटून पडू शकते. प्लान एस्टिमेटमध्ये या नाल्यावर ज्या दोन मोठ्या पुलांचा समावेश आहे. त्या पुलाच्या कामास या मक्तेदाराने सुरूवात देखील केलेली नाही. या पुलाअभावी पावसाळ्यात येणार्या पुराच्या पाण्यातून पाण्यात पादचारी कसे जातील.? असा सवाल उपस्थित होत आहे. नगर पालिकेकडून यावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. प्रभारी मुख्याधिकारी यांच्या कडे अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे ते नवापूरला येऊन रूटीन काम करून निघून जातात. अन्य कर्मचारी साईटवर कधीच जात नाही त्यामुळे मक्तेदाराचे फावलेले असल्याचा आरोप नगराळे यांनी केला आहे.