नवापुरात लोकसहभागातून उपक्रम

0

नवापूर। न वापुर तालुका दैनिक पत्रकार संघ व नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने रंगावली धरणातून गाळ काढण्याचा उपक्रम गेल्या वर्षांपासून सुरू आहे. यातून भूजल पातळी व शेतकर्‍यांची जमीन सुपीक झाली आहे. यातून भविष्यात नवापूर शहरातील पाणी टंचाई दूर होणार आहे. लोकसहभागातून गाळ काढण्याच्या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी रविवारी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नवापूर तालुक्यातील नागझरी गावातील रंगावली धरणाला भेट दिली. यावेळी दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील सह पदाधिकार्‍यांनी उपक्रमाचा लेखाजोखा सादर केला. चार मे पासूनते आजतागायत एक हजार 150 ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला. लोकसहभागातून गाळ काढण्याच्या मोहिमेला अनेक जेसीबी मालकांनी स्वत:चे जेसीबी निशुल्क देऊन मोठे योगदान नोंदविले आहे. यावेळी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरिषकुमार नाईक यांनी 51 हजारांची देणगी उपक्रमासाठी जाहिर केली तर नगरसेवक आरिफभाई बलेसरिया यांनी 25 हजारांची रक्कम देण्याचे कबुल केले.

जल अभियानासाठी नवापूर शहराचे मोठे योगदान
अभियंते बबनराव जगदाळे यांनी उपक्रमासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पाच हजार रुपये रोख दिले. यासह नवापूर शहरातील व्यापारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी हजारो रूपयांची देणगी दिली आहे. जल अभिनयासाठी नवापूर शहरासह तालुक्यातून मोठे योगदान मिळत आहे. या पाहणी कार्यक्रमासाठी नवापूर शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शेतकर्‍यांना आपली जमीन सुपीक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाळ काढून शेतात टाकण्याचे आवाहन करतांना अधिकार्‍यांना उपक्रम यशस्वी करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक यांच्या सहकार्याने व्यापक जनजागृती करण्याच्या सुचना दिल्या.

ड्रोनद्वारे चित्रिकरण
नवापूर तालुका दैनिक पत्रकार संघ व नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. याची प्राथमिक माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मोलगी दौर्‍यात दिली आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार प्रमोद वसावे अध्यक्ष हेमंत पाटील, प्रा.इद्रीस पठाण, मंगेश येवले यासह अन्य पदाधिकारी व सदस्य यांनी उपक्रमाचे नियोजन केले आहे. सुरु असलेल्या कामाची व धरण क्षेत्राचे ड्रोन व्दारे चित्रिकरण करण्यात आले. तयार झालेली चित्रफित थेट मुख्यमंत्री कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन टप्प्यात चित्रफित तयार करण्यात येणार आहे.रंगावली धरणातून गाळ काढण्याच्या उपक्रमासाठी देणगीदारांकडुन धनादेशाद्वारे देणगी रक्कम स्विकारली जात असुन जेसीबीच्या इंधनापोटी करण्यात येणारा खर्च धनादेशाद्वारे अदा करुन पारदर्शक व कॅशलेस व्यवहार पत्रकार संघाकडुन अमलात आणला जात आहे.

यांची होती प्रमुख उपस्थिती
जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन शिरिषकुमार नाईक, नगराध्यक्षा रेणुका गावित, पं.स. सभापती सविता गावीत, नगरसेवक आरिफभाई बलेसरिया, माजी नगरसेवक विनय गावित, तहसीलदार प्रमोद वसावे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, संयोजन समितीचे एजाज शेख व नरेंद्र नगराळे, व्यपारी संघटनेचे अध्यक्ष राजेश अग्रवाल, दिपक अग्रवाल, सुभाष अग्रवाल, कल्पेश अग्रवाल, तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मधुकर पाटील, मंडळ अधिकारी दिलीप कुलकर्णी, सपोनि दिलीप बुवा, जितेंद्र सपकाळे, हेमंत पाटील आदी उपस्थित होते.