नवापूरकरांचे आरोग्य धोक्यात

0

नवापूर : पाणी हे जीवन असते, असे म्हणतात. मात्र, पाणीच पिण्यायोग्य नसल्यास करावे तरी काय, असा प्रश्न नवापूरकरांसमोर उभा आहे. शहरातील नागरिकांना लखाणी पार्क मधील शेकडो घरांचे ड्रेनेजचे पाणी थेट शहरातील मुख्य पाणी पुरवठ्यातील पंप हाऊस जवळील विहिरीत पाणी मिसळत आहे. त्यामुळे 45 हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लखाणी पार्क मधील गटारीचे मिश्रित पाणी नवापूर शहरातील नागरिक पीत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवापूरात जलशुध्दीकरण प्रकल्प लवकर तयार व्हावा यासाठी जनता मोर्चे व आंदोलन करीत आहे, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे.

पालिका प्रशासन अनभिज्ञ
गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू झाला असला तरी पालिका प्रशासन यासंबंधीत अनभिज्ञ आहे. लखाणी पार्क मधील ड्रेनेज पाणी मरीमातेच्या बंधाऱ्याजवळ मिश्रित होत असल्याने संपूर्ण शहराला साथीच्या रोगाची लागण होऊ शकते. कारण देवलफळी, इस्लामपूरा तसेच अनेक भागातील गरिब लोकांना शुद्ध पाणी विकत घेणे परवडत नसल्याने थेट पुरवठ्यातील पाणी पितात. त्यामुळे शहरात मोठी रोगराई पसरू शकते. या समस्यांबाबत पालिकेमध्ये विरोधक देखील गंभीर दिसून येत नाहीत. स्वच्छतेसाठी शासन करोड रूपये खर्च करीत आहे, मात्र नवापुरात यासंबंधी हरताळ फासला जात आहे. नवापूर नगर परिषदेच्या स्वच्छता संदर्भात थेट नंदुरबार चे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अनेक वेळा नाराजी व्यक्त केली आहे.

शहरातील गटारीचे पाणी नदीत जाऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने दोन कोटी रूपये खर्च करून नदी किनारी बंदिस्त गटारी बांधल्या आहेत लाखाणी पार्कच्या संचालकाला पालिकेने नोटीस दिली आहे तातडीने उपाययोजना करण्यात येईल.
मुख्यधिकारी प्रतिभा पाटील, नवापूर नगरपालिका

भाजपाचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव
नवापूर शहरातील लखाणी पार्क या भागातील सांडपाणी गटातून थेट रंगावली नदीपाञात येत असल्याने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका कार्यालयात जाऊन मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांना घेराव घातला. यावेळी देवळफळी भागातील नागरिक उपस्थित होते. नागरीकांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून लेखी निवेदन दिले. प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल वसावे ,जिल्हा चिटणीस एजाज शेख ,जाकीर पठाण ,शैलैश मावची ,विषाल सांगळे , विशाल गावीत उपस्थित होते. नगरपालिकेने लखाणी पार्क भागातील नदी पाञात जाणारे सांड पाणी बंद केलेले नाही. नगर पालिका प्रशासन आता दिशाभुल करित आहे. याकडे लक्ष देऊन समस्या सोडवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.