नवापूर। नवापूर शहरातील लाईट बाजार भागातील गजबजलेल्या मेनरोडवरील भरपूर पाणी देत असलेला हँडपंप नादुरुस्त झाल्याने या परिसरातील लोकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मेनरोड लाईट बाजार हा शहरातील मुख्य भाग असून व्यापारी या भागात मोठया प्रमाणात राहतात. या परिसरात घरे व सोबत दुकाने आहेत. हा सर्वात जुना परिसर आहे. तालुक्यातील नागरिक बाजार करण्यासाठी येथे येत असतात. या भागातील विहिरी जवळ हँडपंप बसवला असल्याने याला 24 तास भरपूर पाणी
असते.
वारंवार तक्रारी केल्यानंतरही दुर्लक्ष
या परिसरातील रहिवासी व व्यापारी यांना पाण्याची चांगली सोय आहे. शहरात खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील लोकांना या हँडपंपचे पाणी पिण्यासाठी उपयोगी आहे. गेल्या काही दिवसापासून हँडपंप नादुरुस्त झाल्याने पाणी उपसा करण्यासाठी प्रयत्न करून ते येत नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. या भागातील रहिवासी व व्यापारी यांनी नगर पालिका प्रशासन व या भागातील नगरसेवक यांना वारंवार तक्रारी केल्यानंतरही तो हँडपंप दुरूस्त केला नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. काही दिवसापुर्वी एक दोन नगरसेवक नादुरुस्त हँडपंप पाहण्यासाठी आले असता काही रहिवाशांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले असल्याचे रहिवाशांनी बोलतांना सांगितले. माञ तरीही कोणताही परिणाम झाला नाही. या हँडपंपला भरपूर पाणी येते माञ तो नादुरुस्त झाल्याने त्या पाण्याच्या उपयोग असुन नसल्या सारखा झाला आहे. हँडपंप दुरुस्त झाला नाही तर येथील रहिवासी नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा तयारीत आहेत. हँडपंप असल्याने येथील व्यापारी व रहिवाशांना विहीर व इतरत्र जाऊन पाणी आणावे लागत आहे. लवकरात लवकर गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.