नवापूर । शहरातील नागरी समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मंगलदास पार्क भागातील नगर पालिका टाऊन हॉल समोरील भागात घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी पसरली आहे. रस्ता अत्यंत खराब होऊन खड्डे पडल्याने डांबरी खडी ही बाहेर निघाली आहे. त्यामुळे वाहनांचा अपघात होण्याच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत. या रस्त्यावर सतत धुळ उडून घरांमध्ये ती जाऊन अस्वच्छता होत असते. या उडणार्या धुळीमुळे अनेकांना खोकल्याची लागण होऊन ते आजारी पडत आहेत.
रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी
मागचा पावसाळ्यात या रस्त्यावर मुरूम टाकण्याची गरज नसतांना नगरपालिकेने डांबरी रस्त्यावर मुरूम टाकल्यामुळे हा धुळ उडणारा (धुळ रस्ता) बनला आहे. तसेच या रस्त्यावर काटेरी झुडपे वाढली असुन ती वाढत रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणार्या वाहन चालकांना समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघात होत असतात व मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागात शाळा व धार्मिक स्थळे आहेत. रोज मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरून वाहने ये जा करतात विशेष म्हणजे या प्रभागातील नगरसेविकेचे देखील घर याच रस्त्यावर आहे. असे असताना या भागात नवीन डांबरीकरण रस्ता का होत नाही? असा सवाल हा भागातील रहिवाशांनी केला आहे. या भागातील रहिवाशांनी हा रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी केली आहे. रस्ता बनविण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. तसेच या रस्त्यावरील पथदिवे अनेक वेळा बंद असतात. त्यामुळे राञी चोरीचे प्रकार अधुन मधुन घडत आहेत. याकडे नगर पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. या भागातील या नागरी समस्येकडे नगरसेवक तसेच नगरपालिका प्रशासनाने गंभीरपणे दखल घेऊन त्या सोडवाव्यात अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
आमच्या भागात डांबरी रस्ता तयार करण्याची गरज आहे. रस्ता खराब झाला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रोज धुळ उडत असल्याने आरोग्य बिघडत चालले आहे. घरात देखील धुळ येऊन अस्वच्छता पसरते. झाडे झुडपे रस्त्यावर वाढुन ती रस्त्यावर आली आहेत. यामुळे अपघात होत आहे. या समस्या नगर पालिकेने सोडवाव्यात तसेच या भागातील उद्यानाचे नूतनीकरण करून ते विकसित करण्याची गरज आहे
मंगलदास पाटील- रहिवासी, नवापूर