नवापूर। येथील मरीमाता मंदिरासमोरील स्मशानभुमीचे पूर्ण नवीन बांधकाम करण्यात यावे, नदीवरुन स्मशानाकडे जाण्यासाठी एक पूल बांधून मिळावा तसेच ईदगाह कब्रस्तानमध्ये सौरऊर्जा पथदिवे लावण्यात यावे, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन एआयएमआयएमतर्फे मुख्याधिकारी विनायक कोते यांना नुकतेच देण्यात आले. निवेदन देतेवेळी एआयएमआयएमचे नवापूर तालुका अध्यक्ष रमीज शेख, नवापूर शहराध्यक्ष सुलतान शेख निसार, तालुका युवाध्यक्ष तौसिफ शेख, अजिम मकरानी, जाविद शेख, सौहेल मकरानी, समीर खाटीक आदी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून नवापूर येथील मरीमाता मंदिरासमोर खुल्या अवस्थेत स्मशानभुमी आहे. त्यामुळे कोणाचाही मृत्यू झाला तर तेथे बसण्यासाठी योग्य जागा नाही, पथदिवे नाही, पाण्याची व्यवस्था नाही. तसेच त्याठिकाणी कंपाऊंड नाही. तसेच नदीवरुन एखाद्या पुलाची उभारणी करण्यात यावी. जेणेकरुन मयतीस घेवून जाण्यास सोयीचे होईल. म्हणून सद्यस्थितीत तेथे कोणीही मृत्यू झाल्यास त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सर्व कामे त्वरित करावे
नवापूर येथील ईदगाह कब्रस्तानमध्ये सौर उर्जाचे एक ही पथदिवे नाही. त्यामुळे मयतीस दफनविधी करण्यासाठी व खोदकाम करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे दोन्ही विषय अत्यंत गंभीर आहे. त्वरित सर्व कामे करुन देण्यात यावे, असेही निवेदनात नमूद केले आहे.