नवापूरला पाणी प्रश्नी अन् टॅ्रफिक समस्येवर उपाय योजना करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

0


नेहरु उद्यानाची केली पाहणी

वापूर । नंदुरबार जिल्हाचे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे हे प्रथमच नवापूर शहरात आले. विश्रामगृहावर आल्यानंतर त्यांनी नेहरू उद्यानाची पाहणी केली.

नवापूर तालुक्यातील गावनिहाय विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे शहर व तालुक्यात आल्याने तालुक्यातील अधिकार्‍यांच्या भुवया उंचावलेल्या होत्या. त्यामुळे धावपळ पहायला मिळाली.

शहरातील नेहरू उद्यान व इतर उद्यानांची झालेली दयनीय अवस्थांसह शहरातील वाहतूक समस्या, पाणी टंचाईवर दै.‘जनशक्ति’मधून ठळक मथळ्यांखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यांची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी नेहरू उद्यानाची पाहणी करत अधिकार्‍यांना समज देवून संबंधित उद्यानाची दुरुस्ती व देखभाल करण्याच्या सूचना तहसील कार्यालय व पालिकेत सभागृहात अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकार्‍यांकडून तालुक्यात जाऊन खासदार, आमदार निधीतून झालेली व इतर विभागाकडून झालेल्या विकास कामांची माहिती घेतली. सोंनपाड़ा येथील विद्युत रोहित्र कागदोपत्री असताना काम झालेले नसल्याचे निदर्शनात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. इतर कामांबाबत समाधानी असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. नगर पालिका सभागृहात बैठक घेऊन स्वच्छता व शहरातील समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी म्हणून नंदुरबार आल्यानंतर प्रथमच नवापूर शहरात आगमन झाले. त्यानिमित्त लोकनियुक्त नगराध्यक्षा हेमलता पाटील, गटनेता गिरीश गावित, सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ता मंगेश येवले यांनी शाल व पुष्प गुच्छ देवून स्वागत केले. प्रसंगी तहसीलदार सुनीता जराड व तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांची जनतेविषयी आस्था
नवापूर येथे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे आढावा बैठक घेत असतांना बाहेर काही नागरिक भेटण्यासाठी उभे असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी पाहिले.त्यांनी ताबडतोब त्यांना आत बोलवायला पाठवून त्यांच्या काय समस्या जाणून घेत त्यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले. यावरुन जिल्हाधिकार्‍यांची जनतेबद्दल असलेली आस्था दिसून आली.