नवापूरात दोन लाखांचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर

0

नवापूर । कोणतीही करवाढ व दरवाढ सुचविता दोन लाख रुपये शिलकी रकमेचा अर्थसंकल्प पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मंजूर करण्यात आला. नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सन 2018-19 च्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. आरंभीची दोन कोटी 68 लाख 25 हजार 929 रुपये शिल्लक मिळून येत्या आर्थिक वर्षांत 21 कोटी 25 लाख 77 हजार रुपये अपेक्षित उत्पन्न मिळुन 23 कोटी 94 लाख दोन हजार 929 रुपयांची आवक अपेक्षित आहे. संपुर्ण आर्थिक वर्षांत 23 कोटी 92 लाख पाच हजार रुपये खर्चाच्या तरतुदी वगळून एक लाख 97 हजार 929 रुपये शिल्लक दाखविण्यात आली आहे.

अपंगांसाठी 4 लाख 50 हजार
खर्चामधे पाणीपुरवठा व जलशुध्दीकरणसाठी एक कोटी 20 लाख दहा हजार रुपये, आरोग्य सुविधांसाठी एक कोटी 52 लाख 40 हजार रुपये, संकीर्ण खर्चासाठी 24 लाख 20 हजार रुपये, रस्त्यांचे कॉक्रिटीकरण, डांबरीकरण व सुशोभीकरण साठी 50 लाख, अग्निशमन सेवेसाठी 13 लाख 20 हजार रुपये, महिला व बाल कल्याण तथा दुर्बल घटकांसाठी प्रत्येकी सात लाख रुपये, अपंगांसाठी चार लाख 50 हजार रुपये, हिंवताप निर्मुलनासाठी तीन लाख रुपये, विद्युत साहित्य खरेदी सतरा लाख रुपये, विद्युत बिलापोटी 20 लाख रुपये, कर्मचारी गणवेश साठी 50 हजार रुपये, ई- गव्हर्नन्स देखभाल दुरुस्तीसाठी पाच लाख रुपये, उद्यान देखभाल दुरुस्तीसाठी दोन लाख रुपये, अमरधाम सुविधेसाठी तीन लाख 50 हजार रुपये व सर्वाधिक तीन कोटी 83 लाख 50 हजार रुपये कर्मचार्‍यांच्या वेतनावरील खर्च प्रस्तावित करण्यात आले आहे. पालिकेद्वारा शासन योजनांमधुन व्यापारी गाळे, पर्यटन विकास व इतर योजना पुर्णत्वाकडे आहेत. नजीकच्या काळात त्यांचे लोकार्पण होऊन पालिकेच्या उत्पन्न स्त्रोतांमधे वाढ होणार आहे. पालिका प्रशासनाकडुन अशा योजना ताब्यात घेण्यासाठी सुरुवात झाली आहे. सभेस उप नगराध्यक्ष अय्युब बलेसरिया, गटनेते गिरीष गावीत, विरोधी गटाचे नेते नरेंद्र नगराळे, बांधकाम सभापती हारुन खाटीक, आरोग्य सभापती विश्‍वास बडोगे, पाणी पुरवठा समिती सभापती आशिष मावची, महिला व बालकल्याण सभापती व नगरसेवक उपस्थीत होते.