नवापूर- अहमदाबादकडे जात असलेल्या व्यापार्याला रीव्हॉल्वर व चाकूचा धाक दाखवून आरोपींनी दोन कोटी 41 लाख 50 हजार रुपये लुटण्याण्याची घटना तालुक्यातील पिंपळनेर रस्त्यावरील रायपूर जामतलाव दरम्यान 11 ऑक्टोबरला घडली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मेघराज दरबार (27 रा. वडनगर, जि. मैहसाणा) याला गुजरात राज्यातील मैहसाणा जिल्ह्यातील वीसनगर येथून पोलिसांनी अटक केली आहे. तो बसने अहमदाबादकडे जात असताना कारवाई करण्यात आली. दरम्यान, नवापूर-पिंपळनेर रस्त्यावरील रायपूर जामतलावदरम्यान झालेल्या लुटीच्या घटनेनंतर पोलिसांनी 12 तासांत गुजरात राज्यातील महेसाणा शहरातून एक कोटी 22 लाख 27 हजार 500 रुपये हस्तगत केले होते. लूट प्रकरणी राजेंद्र कानाजी पटेल,(रा.गुडली लखपत भुज,), अमरसिंग चैनाजी ठाकूर, (मगपूरा, मैहसणा), अक्षय शैलेश पटेल, (टीटोली, सुरत), प्रकाश शांतीलाल पटेल, (टिटोली, सुरत), दीपककुमार हसमुख पटेल, (लक्ष्मीपुरा, उमाजी), हार्दिक गोविंद पटेल, (सुरत) या सहा संशयित आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती मात्र मुख्य संशयित आरोपी मेघराज दरबार पसार होता. त्याला नवापूरचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्यासह पथकाने 51 लाखांसह मेहसाणा जिल्ह्यातून अटक केली आहे. लुटीतील दोन कोटी 41 लाख 50 हजार रुपयांपैकी दोन कोटी 38 लाख 50 हजार रुपये हस्तगस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, आरोपीच्या खिशातून एक लाख 10 हजार रुपये तर त्याने लुटीतील उर्वरित 50 लाख रुपये कर्दा गावातील एका शेतात कडब्याच्या चार्यात पिशवीत लपवल्याच्या आरोपीने सांगितल्यानंतर तेही जप्त करण्यात आले.