नवापूर: तालुक्यातील विसरवाडी परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने 14 दिवस गाव बंद राहणार आहे.लॉकडाऊनच्या पाचव्या टप्या अखेर नवापूर तालुक्यात कोरोना विषाणूने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे.
48 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुष हा माचाहोंडा, गडदानी ,विसरवाडी तीन गावाच्या संपर्कात आल्याने प्रशासनाकडून युद्ध स्तरावर उपाय योजना करण्यात येत आहे.रुग्णाचा विसरवाडी गावाचा अधिक संपर्क असल्याची माहिती उघड झाल्याने विसरवाडी परिसर पुढील 14 दिवसासाठी कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 14 दिवस अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली. सम्पूर्ण विसरवाडी गावात बेरीकेटिंग करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
आजूबाजूच्या पाड्यातील लोकांनी घराबाहेर पडू नये तसेच शासनाचे नियमांचे पालन करत मास्क लावत सोशल डिस्टनसिंग ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नवापूर तालुक्यातील एक पुरुष एक महिला पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने प्रशासनाची धावपळ उडाल्यानंतर रात्री १० वाजता विसरवाडी येथील 48 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. विसरवाडी जवळील गडदाणी जवळील हा पुरुष आहे. नवापूर तालुक्यात कोरोणा पॉझिटिव्ह आढळून आलेलं हे ग्रामीण भागातील पहिले प्रकरण आहे. संशयित रुग्ण क्वारंटीन करण्यात आला होता. तीन दिवस आधी त्याचा स्वाब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज आला. संशयित रुग्णास तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली. ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. संपर्कात आलेल्याची माहिती घेण्यात येत आहे.
संपर्कातील लोकांचा शोध घेऊन क्वारंटाईन
नवापूर तालुक्यातील विसरवाडी भागात कोरोना रुग्ण आढळल्याने बीडीओ नंदकुमार वाळेकर व तहसीलदार सुनिता जऱ्हाड, विसरवाडीचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्याहादे, वैद्यकिय अधिकारी हरीश्चंद्र कोकणा यांनी रात्रभर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन कोरंटाईन केले. विसरवाडी भागात टिमसह त्यांनी परिसर सील केला.उपाय योजना केल्या. संपुर्ण रात्र अधिकाऱ्यांनी जागुन काढली.