नवापूर पंचायत समितीने टाकली कात

0

नवापूर । नवापूर पंचायत समितीत नागरिकांच्या व प्रशासकीय कामकाजात होणारा विलंब टाळून सर्व थकीत प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल या उपक्रमातंर्गत नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या टिमने आधुनिक रेकार्ड रूम तयार करून जिल्ह्यात अव्वल स्थान मिळाले आहे. तब्बल 40-50 वर्षे धुरळाखात पडलेली अस्ताव्यस्त कागदपत्रे, प्रलंबित प्रकरणे, परिणामी जनतेची रखडणारी प्रकरणे अशी असलेली नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पंचायत समतितील परिस्थिती झिरो पेंडन्सी’ने काही दिवसांत बदलली आहे. पुर्वी दहा- पंधरा दिवसात होणारे अवघ्या तासभरात काम होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

दिड महिनाभरापासून सुरू होते काम
राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये अशा प्रकारे कामकाज चालून शून्य प्रलंबिता (झिरो पेंडन्सी), दैनंदिन निर्गती (डेली डिस्पोजल) कामे होण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सचिव असिम गुप्ता यांची काही दिवसांपूर्वी शासन निर्णय निघाला होता त्याअनुशंगाने नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी झिरो पेंडन्सी उपक्रम हाती घेतला.आधुनिक पद्धतीने फाईल्स ठेवण्यात आली आहे. कॉम्पॅक्टरमध्ये स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. सरकारने जुनी व महत्त्वाची कागदपत्र स्कॅन करुन त्याचा संगणकीय रेकॉर्ड करण्यासाठी डीजिटायझेशन मोहीम हाती घेतली होती नंदुरबार जिल्ह्यात सर्वात आधी नवापूर पंचायत समितीने शुभारंभ केला आहे. गटविकास अधिकारी सह कर्मचारी यांनी धुळखात दीड महिनापासून रेकॉर्ड रुमचे काम सुरू केले होते. कुठेही दुर्घटना होऊ नये म्हणून अग्नीशमन ची व्यवस्था केली आहे. रेकॉर्ड जास्त काळ टिकेल याबाबत देखील खास व्यवस्था केली आहे.

प्रशासकीर अनास्था बदलणार
स्थानिक पातळीवर कामाला विलंब झाल्याने अनेक जण मंत्रालयात समस्या घेऊन येतात. आणि या समस्यांचं निवारण त्वरीत न झाल्यानं अनेक जण आत्महत्येचं पाऊल उचलतात. मागील काही दिवसांपासून मंत्रालयात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून सरकारने आता सर्वसामान्यांच्या तक्रारी त्वरीत सोडवण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत. दर दिवशी प्राप्त झालेला संदर्भ आणि प्रकरणावर त्याच दिवशी निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे.आतापर्यंत ’सरकारी काम आणि सहा महिने थांब’, असे काहीसे समीकरण आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र, आता एक पाऊल पुढे टाकत राज्य सरकारने ही परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ’झिरो पेंडन्सी ऍण्ड डेली डिस्पोजल’ ही पद्धती अवलंबली जात आहे. ’सरकारी काम आणि सहा महिने थांब ’ ही मानसिकता आणि प्रशासकीय अनास्था बदलण्यास राज्य सरकारचे हे धोरण कितपत प्रभावी ठरणार आहे, हे येणारा काळच ठरवेल.

दोन ट्रक रद्दी निघाली
हा उपक्रम प्रभावीपणे राबविला. त्यातून अवघ्या दीड महिन्यात साधारण दोन ट्रक कागदपत्रांची रद्दी काढण्यात आली आहे. काही वर्षांपासून रखडलेली कागदपत्रे मार्गी लागली. स्थनिक स्वराज्य संस्था मधील पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या कामकाजात स्वच्छ कार्यालय व तत्पर प्रशासन (झिरो पेंडन्सी ऍण्ड डेली डिस्पोजल) पध्दती रुजू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. कर्मचारी देखील तणावमुक्त झाले आहेत.

अभिलेख वर्गीकरण
नवापूर पंचायत समितीच्या रेकॉर्ड रुम मध्ये आधुनिक पध्दतीच्या कॉम्पॅक्टरमध्ये चार प्रकारच्या फायली असून, त्यात अभिलेख अ, ब, क व क -1 असे नाव देण्यात आले आहे. अभिलेख अ- गठ्ठे संख्या 218, फाईल संख्या ब- गठ्ठे संख्या 552, फाईल संख्या 6553 क- गठ्ठे संख्या 38, फाईल संख्या 440 क1 निरंक, ड- फाईल्स संख्या 14 हजार 807 नवापूर पंचायत समितीच्या अभिलेख कक्षात एकूण गठ्ठे 808 आहे आणि फाईल्स संख्या 24 हजार 463 एवढी आहे.

प्रत्येक विभागात सहा गठ्ठे पद्धती
नवापूर पंचायत समिती मधील शिक्षण, अर्थ,बांधकाम, आरोग्य, ग्रामीण पाणी पुरवठा, लघुपाटबंधारे, सामान्य प्रशासन, एकात्मिक बाल विकास योजना, पशु संवर्धन, कृषी, नरेगा, स्वच्छ भारत मिशन, घरकूल कक्ष, ग्रामपंचायत, एन आर एल एम असे पंधरा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहा गठ्ठे पद्धती कपाट तयार केले आहे. त्यात प्रलंबित प्रकरणे, प्रतीक्षाधिन प्रकरणे, नियतकालिके, स्थायी आदेश संचिका, अभिलेख कक्षात पाठविण्याची प्रकरणे, नष्ट करावयाची कागदपत्रे (ड-कागदपत्रे) असे वर्गीकरण करून दप्तर ठेवण्यात आले आहे.

रेकॉर्ड रुमची रंगसंगती
नवापूर पंचायत समितीतील 15 विभागाचे रेकॉर्ड अभिलेख कक्षेत ठेवण्यात आले आहे. रेकॉर्ड रुम मध्ये चार रंगात गठ्ठे बांधण्यात आले आहे. लाल कापड्यात अभिलेख अ फायली असून, त्या कायमस्वरुपीची आहे. हिरव्या कापड्यात अभिलेख ब फाईल्स आहे. त्या 30 वर्षेपर्यंत सांभाळायच्या आहेत. त्याचप्रमाणे पिवळ्या कपड्यात अभिलेख क फायली असून, त्याचे आयुष्यमान 10 वर्षे आहे तर अभिलेख क -1 पांढ-या कपड्यात फायली 5 वर्ष सांभाळायच्या आहेत. अभिलेख ड- एका वर्षांपर्यंत कालावधी आहे. या सर्व फायलींचे आयुष्य ठरले असून त्यांची मुदत संपली तर त्यांना नंतर नष्ट करण्यात येते. फक्त कायमस्वरुपी फायली कायम जपल्या जातात.

काम लोकाभिमुख आणि गतीमान झाले
शून्य प्रलंबिता (झिरो पेंडन्सी), दैनंदिन निर्गती (डेली डिस्पोजल) या उपक्रमामुळे दररोज ग्रामीण भागातून पंचायत समितीत मोठ्या प्रमाणात होणारी मोठी गर्दी कमी झाली आहे. फाईल्स शोधण्यासाठी आठ दिवस, पंधरा दिवस लागायचे परंतू सध्या पाच मिनिटांत फाईल सापडते आणि झटपट काम होते. प्रत्येक कर्मचारी सहा गठ्ठे पद्धतीने काम करीत आहे. कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आणि ते कामलोकाभिमुख झाले आहे.
– नंदकुमार वाळेकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, नवापूर