नवापूर । महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय युवा पुरस्कार क्रीडा विभागानुसार एक नोंदणीकृत संस्थेला दिला जातो. सन 2014-15 वर्षाचा पहिला पुरस्कार नाशिक विभागातून नवापूर येथील वनवासी उत्कर्ष समितीला या संस्थेला राज्य सरकार कडून जाहीर करण्यात आला आहे. मार्च महिन्यात मुंबईला राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. एक लाख रुपये, गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जिल्हास्तरावर 50 हजारांचा, तर राज्यस्तरावर एक लाख रुपयांचा पुरस्कार युवक-युवती आणि संस्थेला दिला जातो. हा पुरस्कार वनवासी उत्कर्ष समितीला मिळाल्याने सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.
सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण भागात काम
नवापूर शहरातील वनवासी उत्कर्ष समितीने प्राथमिक शिक्षण, संगणक साक्षरता, सुक्ष्म लघु विमा, ग्रामविकास, गौ.अनुसंधान व पशुसंवर्धन, जन आरोग्य रक्षण व संवर्धन, रोजगाराभिमुख प्रशिक्षण या सात क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याने पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ’दुरीतांचे तिमीर जावो’ या प्रमुख उद्देशाने 1995 साली मुकुंद लक्ष्मण निकम यांनी ग्रामीण भागात सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक विकास व्हावा यासाठी संस्था स्थापन केली.गेल्या 21
वर्षापासून अविरत कार्य करीत आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने संस्थेचे व अध्यक्ष मुकुंद निकम व संचालक मंडळीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
ग्रामीण पायाभूत गोष्टीवर लक्ष केंद्रित
काही स्वयंसेवी संस्था शासनाच्या शासकीय योजनेच्या अंमलबजावणी एजन्सी बनत चाललाय आहेत. त्याऐवजी जनतेच्या गरजा लक्षात घेऊन काम केले पाहिजे.आमची संस्था ग्रामीण भागात जाऊन खेड्यातील शाश्वत विकासाची संधी शोधून नैसर्गिक संसाधने रोजगार,स्वविकास,ग्रामविकास व पायाभूत गोष्टीवर लक्ष केंद्रित करीत असल्याचे वनवासी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष मुकुंद निकम यांनी सांगितले.
संस्थेचे सामाजिक उपक्रम
तालुक्यात सहा गावांमध्ये जैवविविधता समित्याची स्थापना करून जैवविविधते संबंधी जनजागरण, 30 स्वयंसहायता गट व 15 शेतकरी मंडळे रोजगारासाठी राईस मिल चालवत आहे.योगासन शिबिर, कृषी क्षेत्रात कमी वेळेत जास्त काम करण्यासाठी आधुनिकी तंत्रज्ञानाचा वापर प्रशिक्षण, वृक्षारोपण, क्रीडा क्षेत्रात मल्लखांब, असे अनेक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात.