नवापुर। शिक्षकच नसलेल्या विषयाचा पेपर आणी त्यातही अर्धा तास उशिरा प्रश्नपत्रिका देऊन वेळेच्या आधीच उत्तरपत्रिका जमा करण्यासह परिक्षार्थी विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देण्याचा उपद्रव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका शिक्षकाने आज वार्षिक परिक्षे दरम्यान केल्याने विद्यार्थ्यांच्या निकालावर दुष्परिणाम होणार असल्याची भिती विद्यार्थ्यांना वाटते आहे. शैक्षणिक क्षेत्रातील या धक्कादायक प्रकाराबाबत काही विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आजच्या पेपरसाठी एका वर्गात नियुक्ती असलेले पर्यवेक्षक शिक्षक पेपरची वेळ दुपारी 2:30 वाजताची असतांना तब्बल अर्धा तास उशिराने तीन वाजता वर्गात आल्यावर प्रश्न व उत्तरपत्रिका दिल्या. वर्गात आल्यापासून या पर्यवेक्षक महाशयांनी सगळ्याच परिक्षार्थी विद्यार्थ्यांवर विनाकारण चिडणे, काहीही बोलणे, गैरवाजवी प्रश्न विचारणे, वगैरे मानसिक त्रास देण्याचा निर्लज्ज उपद्रव केला. या शिक्षकांनी त्रास देण्यात विद्यार्थिनींनाही कसूर केली नाही. परिक्षार्थी विद्यार्थ्यांना शांततेने पेपरही लिहू दिला नाही.
वेळेआधीच केली उत्तरपत्रिका जमा
आधीच उशिराने पेपर सुरू झाला असतांना एका विद्यार्थ्याने चुकून मोबाईल फोन वर्गात आणल्याबद्दल सदर शिक्षकाने त्या विद्यार्थीला चुकीची वागणूक देत खालच्या पातळीवर बोलल्याने वाद निर्माण झाला. याचे पर्यावसन गंभीर स्तरावर पोहोचण्यापावेतो झाले होते. आधीच अर्धा तास उशिरा पेपर मिळाल्यावरही वर्गातील या भांडणामुळे व नंतरही पर्यवेक्षकांच्या त्रासामुळे विद्यार्थ्यांची मानसिकताच बिघडली होती. विशेष म्हणजे सौंदर्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थीनींचा ज्या विषयाचा आज पेपर होता त्या ई सी एस विषयाचे शिक्षकच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नसल्याने काहीही शिकविले नव्हते. या सर्व प्रकारात कहर म्हणजे प्रश्नपत्रिकेवर तीन तासांची वेळ दिली असतांना शेवटी पुन्हा वीस मिनिटे आधीच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका हिसकावून घेत मनमानी कारभार आणी उद्दामपणाचे प्रदर्शन संबंधीत शिक्षकांनी घडवले. एका शिक्षकामुळे घडलेल्या प्रकाराबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी व कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा विद्यार्थी वर्गातून व्यक्त होत आहे. दरम्यान या बाबत माहिती घेण्यासाठी प्रतिनिधीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भेट दिली असता प्राचार्य वा जबाबदार कुणीही भेटले नाहीत.