आदिवासी समाजाने केले आंदोलन
नवापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले की, धनगर समाजाला अनुसुचित जमाती मध्ये समावेश करण्यासाठी राज्य शासनाने केंद्रसरकार कडे प्रस्ताव पाठविला आहे. केंद्र सरकारकडुन मंजुरी मिळाल्यावर धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येईल असे आदिवासी विरुध्द वक्तव्य व भुमिका घेऊन आदिवासी समाजाचा न्याय हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करीत आहेत. याचा नवापूर येथे समस्त आदिवासी बांधवाकडुन जाहीर निषेध करण्यात आला.
नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक विजयसिंह राजपुत यांना समस्त आदिवासी समाजाने निवेदन दिले. त्यानंतर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावीत, विनयाक गावीत, पं स उपसभापती दिलीप गावीत, आर.सी.गावीत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंरतु पोलिसांनी तो हिसकावुन ताब्यात घेतला. यानंतर त्याच ठिकाणी नवापूर तालुक्यातील आदिवासी समाज बांधवानी धरणे आंदोलन केले. यावेळी नवापूर पोलीसांनी आंदोलकांना मुंबई पोलिस कायदा कलम ६८अन्वये अटक करुन कलम ६९ अन्वये सुटका करण्यात आली.आंदोलन बघण्यासाठी बसस्थानक मार्गावर एकच गर्दी झाली होती. शहरात या आंदोलनाची एकच चर्चा होत आहे.