नवापूर येथे साखरपुड्यासाठी आले आणि लग्न करून गेले

0

नवापूर। लग्न करण्याचा खर्चीक पद्धतीसह लग्न सोहळ्याच्या बडेजावाला फाटा देत येथील निकम कुटूबियांनी साखरपुड्यातच साध्यापद्धतीने विवाह सोहळा पार पाडला. यातून समाजासमोर एक आदर्श निकम कुटुंबियांनी घातला आहे. अहमदनगर येथील सचिन भास्कर पगारे या तरूणाचा नवापूर येथील हेमांगी राजेंद्र निकम या तरूणीसोबत विवाह ठरला होता. केश कर्तनालय चालविणार्‍या या तरूणाच्या वडीलांचे निधन झालेले असून आई, बहिण, भाऊ असा परिवार आहे. हेमांगी ही नवापूर नाभिक हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम यांची पुतणी आहे. हेमांगी व सचिन यांच्या साखरपुड्यांचा कार्यक्रम गुरूवारी नवापूर येथे होणार होता.

बैठकीत करण्यात आली चर्चा : साखरपुड्याची दोघ कुटुंबियांनी जय्यत तयारी केली होती. दरम्यान, जिल्हा नाभिक हितवर्धक संस्थेची बैठक अक्कलकुवा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समाजातील वाढत्या लग्न खर्चांवर चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच जुन्या अनिष्ठ रुढी-परंपरा यांना संपविण्याबाबत व्यापक चर्चा करण्यात आली होती. याप्रसंगी संजय शिंदे यांनी लग्नातील वाढता खर्चांत कपात करण्यासाठी साखरपुड्यातच लग्न लावण्यात यावे अशी सूचना मांडली होती. यात आहेर देणे, जवायांना नाराळ लावणे आदी अनिष्ट प्रथांना फाटा देण्याचे ठरविण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी करत नवीन रिवाजाची मुर्हूतमेढ करण्याचा विचार सुधरी निकम यांनी केला. यासंदर्भांतील प्रस्ताव त्यांनी मुलाकडील मंडळींसमोर ठेवला. यानुसार साखरपुड्याला दोन दिवसाचा अवधी असतांना सोशल मिडीयाचा वापर करून लग्नाचे निमंत्रण देण्यात आले.

वैदिक मंत्रोच्चारांचा जयघोष
तसेच लग्नात सवाद्य मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने वैदिक मंत्रोच्चाराच्या जयघोषात हेमांगी व सचिन विवाहबद्ध झालेत. नवापूर शहरात अशा प्रकारचा प्रथमच विवाह झाल्याने समाजासमोर एक आदर्श ठेवण्यात आला आहे. सुधीर निकम यांनी आपली भावना मांडतांना सांगिले की, एखाद्याने चांगला विचारावर अंमल करावयाचे ठरविल्यास परमेश्वराची कृपा होवून त्यास इतरांचेही सहकार्य लाभते. त्यासाठी खर्‍या अर्थांने प्रयत्नांची गजर असते.