नवापूर शहरातील डायलेसीस रुग्णांना न्याय मिळवून द्या

0

नवापूर । शहरातील डायलेसीस रुग्णांना न्याय मिळवून द्या, अशी मागणी भाजपाचे जिल्हा चिटणीस एजाज करिमोद्दीन शेख यांनी मुख्यमंत्री, नंदुरबार जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नवापूर शहरात डायलेसीसचे 7 रुग्ण आहे. ते या मागील आठवड्यापर्यंत डायलेसीस करण्यासाठी गुजरात राज्यातील व्यारा, सुरत येथे जात होते. परंतु कोरोनाचा संसर्ग जास्त वाढल्याने सुरत व तापी (व्यारा) जिल्हाधिकार्‍यांनी व्यारा सिव्हिल हॉस्पिटलच्या लेखी आदेशाने कळविले की महाराष्ट्रातील कोणत्याही रुग्णांचा उपचार करण्यात येऊ नये, म्हणून या दोन्ही शहरात डायलेसीससाठी जाणार्‍या रुग्णांना मागील आठवड्यापासून नाकारण्यात आले आहे. नवापूर शहरातील डायलेसीस रुग्णांमध्ये निखिल अरविंद जोशी, अशफाक युसूफ कुरेशी, युसूफ मियाखा कुरेशी, मुस्ताक युसूफ कुरेशी, रवींद्र गुलाबराव पाटील, अरविंद भीकुभाई प्रजापत, अनुरागसिंग बलविरसिंग यादव यांचा समावेश आहे.
डायलेसीसच्या रुग्णाचे एक-एक डायलेसीस मिस झाले आहे. त्यामुळे आज सकाळी यापैकी 3 रुग्णांना नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल व नंदूरबार नगरपालिकेच्या डायलेसीस केंद्रावर नवापूरहून यांना पाठविले होते. परंतु त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन डायलेसीस न करता दोन्ही ठिकाणाहून परत नवापूर पाठवुन देण्यात आले. या सर्व रुग्णांना उद्यापर्यंत डायलेसीस झाले नाही तर त्यांची प्रकृती खालावणार असल्याचे लक्षण त्यांच्या शरीरावर दिसायला सुरवात झाली आहे. म्हणून त्यांचे डायलेसीस होणे गरजेचे आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांनी नवापूरच्या या रुग्णांचा माणुसकीच्या नात्याने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांचे डायलेसीस व्यारा (गुजरात) अथवा नंदुरबारला होऊ शकेल. त्यांच्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ते आदेश तापी जिल्हाधिकारी अथवा नंदुरबार सिव्हिल सर्जन यांना देऊन डायलेसीस रुग्णांना उपचाराची सोय करून द्यावी, अशीही मागणी शेख यांनी केली आहे.